ठाणे : रेल्वे स्थानकावर मिळणारा चहा, हा प्रवासाचा शीण घालविण्याचा अनेकांचा आवडता मार्ग… अशा वेळी कितीही पानचट असला तरी तो ‘अमृततुल्य’ वगैरे भासतो. मात्र कोकण विभागातील बहुतांश स्थानकांमध्ये चहा विक्रेते कटिंग चहामध्ये आणखी ‘कटिंग’ करत असल्याचे उघड झाले आहे. कोकण वैधमापनशास्त्र विभागाने केलेल्या कारवाईदरम्यान प्रशासनाने आखून दिलेल्या मापाच्या निम्माच चहा प्रवाशांना दिला जात असल्याचे समोर आले आहे.
आता संबंधित कॅन्टीन मालकांविरोधात खटला दाखल करण्यात आला असला तरी गेली अनेक वर्षे ‘मापात पाप’ करून कॅन्टीन चालक आणि कर्मचाऱ्यांनी फसवणूक करत दुप्पट नफा कमावल्याचे यामुळे अधोरेखित झाले आहे. वैध अधिनियम २००९ आणि त्याअंतर्गत नियमांनुसार व्यापारी तसेच औद्याोगिक आस्थापनांकडे वापरात असलेली वजने, मापे यांची पडताळणी केली जाते.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, ठाणे; पालघर जिल्ह्यातील वसई; रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत; रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ रेल्वे स्थानकावर संबंधित जिल्हा उपनियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली चहा, खाद्यापदार्थ व इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वैधमापनशास्त्र यंत्रणेतील निरीक्षकांनी अचानक भेटी देऊन तपासणी केली.
यामध्ये विक्रेते चहाच्या मापात घोळ करत असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. याबाबत अधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित कॅन्टीन मालकांवर कारवाई केली आहे. चिपळूण, रत्नागिरी स्थानकांवरील आस्थापनेवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आवेष्टित वस्तूवर नियमातील तरतुदीन्वये आवेष्टनावर घोषवाक्य नमूद न केल्यामुळे प्रकरण दाखल करण्यात आले आहे.