ठाणे : भिवंडी महापालिकेच्या शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीला मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीत दाखवून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ४० वर्षीय शिक्षकाला शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. पिडीत मुलगी शाळेत जाण्यास टाळाटाळ करू लागल्यानंतर तिच्या पालकांनी याबाबत मुलीकडे विचारणा केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
पिडीत मुलगी १२ वर्षीय असून ती भिवंडीमध्ये महापालिकेच्या शाळेत शिकते. मागील काही दिवसांपासून ती शाळेमध्ये जाण्यास टाळाटाळ करू लागली होती. तिच्या वडिलांनी याबाबत तिला विचारले असता, तिचे शिक्षक तिला मोबाईलमध्ये अश्लील चित्रीकरण दाखवित तिचा विनयभंग करत असल्याचे तिने सांगितले. यानंतर पालकांनी तात्काळ शांतीनगर पोलीस ठाणे गाठले. संबंधित शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.
© The Indian Express (P) Ltd