निरनिराळ्या समाज घटकांना सत्ताकारणात स्थान मिळावे, त्यांचे प्रश्न विधिमंडळात ठळकपणे मांडले जावेत, या हेतूने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांची योजना झाली असली तरी आता एकमेकांपेक्षा वरचढ ठरण्याच्या स्पर्धेत या मतदारसंघातील निवडणुकाही पूर्णपणे राजकीय दावणीला बांधल्या गेल्या आहेत. शुक्रवारी होणाऱ्या कोकण विभाग मतदारसंघ निवडणुकीनिमित्त प्रचाराची जी धुळवड उडाली, त्यावरून हे स्पष्ट झाले आहे.

गेली चार दशके संघ परिवारातील व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणाऱ्या या मतदारसंघात यंदा प्रथमच उमेदवार उभा करून शिवसेनेने भाजपला थेट आव्हान दिले आहे. बदलापूरचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचे बंधू ज्ञानेश्वर म्हात्रे यांना शिक्षक सेनेने उमेदवारी दिली आहे. गेली १२ वर्षे शिक्षकांचे प्रश्न अतिशय पोटतिडकीने मांडणारे रामनाथ मोते यांना डावलून भाजपप्रणीत शिक्षक परिषदेने यंदा वेणूनाथ कडू यांना उमेदवारी दिली आहे. रायगड जिल्ह्य़ातून शेकापचे बाळाराम पाटील निवडणूक रिंगणात आहेत. लोकभारतीने अशोक बेलसरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एरवी एकतर्फी होणारी ही लढत बहुरंगी होणार हे जवळपास स्पष्ट आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही रामनाथ मोते यांना पाठिंबा देऊन या निवडणुकीत उडी घेतली आहे. आमदार रामनाथ मोते यांच्यामुळे शिक्षक परिषद सर्व ठिकाणी पोहोचली असली तरी एक तप लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर त्यांनी आता थांबावे, दुसऱ्या उमेदवाराला संधी द्यावी, असे भाजपचे म्हणणे होते. त्यावर मोते यांनी मात्र आपण शिक्षक आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहावरूनच निवडणुकीच्या रिंगणात आहोत, असा पवित्रा घेतला आहे. कडू आणि मोते यांच्यामुळे भाजपप्रणीत मतांची किती विभागणी होते, यावर निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्य़ातील एकूण ३७ हजार शिक्षक या निवडणुकीत मतदान करणार आहेत. एकीकडे महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना आमदार, खासदार आणि मंत्री शिक्षक मतदारसंघाचा गड सर करण्यासाठी शाळांचे उंबरठे झिजवून शिक्षकांच्या गाठीभेटी घेताना दिसत होते.

Story img Loader