मुरबाड, शहाड, कल्याण, भिवंडी परिसरातील अनेक शिक्षक मुंबईतील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये नोकरी करीत आहेत. कल्याण स्थानकातून सकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी सुटणारी लोकल या शिक्षकांसाठी सोयीची ठरत होती. या लोकलमुळे शाळेत वेळेत पोहोचणे शिक्षकांना शक्य होत असे. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेने ही लोकल बंद केल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला असून ही लोकल पुन्हा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पाच वाजून ४४ मिनिटांची लोकल बंद झाल्याने शिक्षकांना भल्या पहाटे उठून कल्याण रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने सुटणारी ५ वा. २१ मिनिटांची लोकल पकडावी लागत आहे. ही लोकल खूप लवकर मुंबईत पोहोचते. ५ वा. ४४ मिनिटांची लोकल अगदी शाळेच्या वेळेत मुंबईत पोहोचत असे. त्यामुळे प्रवास आणि शाळेत अचूक वेळेत जाण्याचे गणित जुळवणे सहज शक्य व्हायचे. मुंबईकडे जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकातून ६ वाजून ४ मिनिटांची लोकल आहे. ही लोकल शाळा सुरू झाल्यानंतर मुंबईत पोहोचत असल्याने या लोकलचा शिक्षकांना कोणत्याही प्रकारचा उपयोग नाही. त्यामुळे ही सकाळची लोकल सुरू करावी, अशी जोरदार मागणी शिक्षकांचे प्रतिनिधी चंद्रशेखर भारती, उमेश शिंदे, दिलीप काटेचा यांनी केली आहे.

Story img Loader