ठाणे : शासन निर्णयानुसार राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक विषय शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध होणार नाहीत, याचा थेट परिणाम शिक्षण व्यवस्थेवर होणार आहे. आदिवासी, दुर्गम भागातील शाळा,मराठी शाळा, रात्र शाळा आणि भाषिक शाळा बंद पडण्याची भीती यामुळे निर्माण झाली आहे. या शासन निर्णयाविरोधात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने गुरुवारी बीजे हायस्कूल येथील माध्यमिक शिक्षण विभागाच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसेना (उबाठा) नेते केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात जिल्ह्याच्या विविध भागातील शिक्षक सहभागी झाले होते.
या आंदोलनादरम्यान शिक्षकांनी घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला. शिक्षक कपातीमुळे शिक्षण व्यवस्था कोलमडणार असून, ग्रामीण भागातील, आदिवासी, मराठी, आणि रात्र शाळांवर मोठा परिणाम होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. तसेच नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबवायचे असेल, तर शिक्षक संख्येत वाढ करणे आवश्यक होते. मात्र, याउलट सरकार शाळा टिकवण्या ऐवजी बंद करण्याचा डाव आखत असल्याचा आरोप यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने केला आहे.
शिक्षक सेनेच्या ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान गावडे यांनी सांगितले की, ‘शाळा टिकल्या तरच शिक्षण टिकेल’ या घोषणेसह हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. राज्य सरकारच्या शिक्षकांविरोधातील धोरणाविरुद्ध राज्यभरात आंदोलन होत आहे. ठाण्यातील शिक्षकांचाही या धोरणाला तीव्र विरोध असून ठाणे जिल्ह्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागातील शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते.
या आहेत शिक्षकांच्या प्रमुख मागण्या
शिक्षक कपातीचा निर्णय त्वरित रद्द करावा.
नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबवण्यासाठी शिक्षक संख्येत वाढ करावी.
ग्रामीण, आदिवासी, मराठी, व भाषिक शाळांचे संरक्षण करावे.
रात्र शाळा व दुर्गम भागातील शाळा बंद होणार नाहीत याची हमी द्यावी.
विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्काचे संरक्षण करावे.
विद्यार्थ्यांचे भवितव्य त्यांच्या शिक्षकांवर अवलंबून आहे. शिक्षकांच्या हक्कांवर आणि पर्यायाने मराठी शाळांवर गदा आणली तर पुढची पिढी घडणार कशी? त्यामुळे राज्य सरकारने शिक्षक कपात रद्द करून शिक्षकांना न्याय द्यावा.केदार दिघे, जिल्हाप्रमुख शिवसेना (उबाठा)