कल्याण : येत्या पाच वर्षात कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत स्मार्ट सिटीतील अनेक महत्वाचे प्रकल्प पूर्ण करून स्मार्ट कल्याण डोंबिवलीची स्वप्ने पाहणाऱ्या पालिका प्रशासनाने, प्रशासनातील विविध विभागातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी नवोदित उमद्या नवतरुण पदवीधर अभियंत्यांची भरती करण्या ऐवजी सेवानिवृत्त अभियंत्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याने लोकप्रतिनिधी, नवोदित अभियंत्यांमध्ये प्रशासनाच्या या निर्णया बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेवानिवृत्तांची भरती करण्यासाठी पालिका प्रशासनाने डिसेंबर २०१६ च्या शासन अध्यादेशाचा आधार घेतला आहे. पालिकेच्या गेल्या २५ वर्षात कधीही असा प्रयत्न प्रशासनाने केला नव्हता. गेल्या महिन्यापू्वी प्रशासनाने १२ वर्षाहून अधिक काळ सेवेत झालेल्या अभियंत्यांना पदोन्नत्ती दिली. यामुळे कनिष्ठ अभियंते आता उपअभियंते झाले आहेत. कनिष्ठ अभियंता पदावर काम करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने विकास कामांवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. एका प्रभागात बांधकाम, विद्युत आणि जल-मलनिस्सारण कामांसाठी सामान्य प्रशासन विभागाने तीन उपअभियंते नियुक्त केले आहेत. या अभियंत्यांच्या हाताखाली काम करणारे कनिष्ठ अभियंते पुरेसे नसल्याने प्रभागात काम करणाऱ्या उपअभियंते, कनिष्ठ अभियंत्यांना अडचणी येऊ लागल्या आहेत.

हेही वाचा : ठाणे : मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहतूक कोंडी

एक कनिष्ठ अभियंत्याकडे चार ते पाच पदभार असल्याने तो कामाने पिचून जात आहे. त्याचा विपरित परिणाम विकास कामावर होत आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.एकाच कनिष्ठ अभियंत्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने सेवानिवृत्त अभियंत्यांची कनिष्ठ अभियंता पदावर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण डोंबिवली पालिका आणि लगतच्या तालुका परिक्षेत्रात शेकडो नवतरुण अभियंते नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. काही विकासक, काही खासगी आस्थापनांमध्ये अल्पशा वेतनावर काम करत आहेत. अशा नवोदित अभियंत्यांना पालिकेने भरती केले तर नवदम्याने हे नवतरुण अभियंते काम करतील, असे माजी नगरसेवक आणि कल्याण शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बासरे यांनी सांगितले.

बहुतांशी सेवानिवृत्त अभियंते ४० वर्ष प्रशासनात सेवा केल्यानंतर त्यांची क्रयशक्ती कमी झालेली असते. काहींना अनेक व्याधी जडलेल्या असतात. ते कामाची गरज म्हणून दिलेल्या पदावर कामावर येतील पण ज्या गतीने क्षमतेने काम पूर्ण होणे आवश्यक आहे. ते काम या सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंत्यांकडून पूर्ण होणार नाही, असे माजी नगरसेवक बासरे यांनी सांगितले.कनिष्ठ अभियंता पदासाठी कल्याण डोंबिवली पालिकेसह सिडको, म्हाडा, नगरपालिका, शासन सेवेतील निवृत्त अभियंत्यांचा विचार केला जाणार आहे.

हेही वाचा : बदलापूरच्या कचराभूमीवर अंबरनाथचा कचरा नको ; शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रेंचा आंदोलनाचा इशारा

निवृत्त झालेले बहुतांशी अभियंते हे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, शहर अभियंता आणि उच्चश्रेणीतून निवृत्त झालेले असल्याने ते कनिष्ठ अभियंता पदावर काम करण्यासाठी येणार नाहीत, असे बासरे यांनी सांगितले.प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पालिकेत अडीच वर्षापासून नगरसेवक नसल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. पालिकेत लोकप्रतिनिधी राजवट सुरू झाली की हे सगळे मनमानीचे विषय महासभेच्या माध्यमातून उपस्थित केले जाणार आहेत. दोन वर्षाच्या करोना महासाथीनंतर विकास कामे मार्गी लावण्या ऐवजी आता प्रशासन विकास कामांच्या बाबतीत चाचपडत आहे, अशी टीका बासरे यांनी केली.

१३ अभियंत्यांची भरती

स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत विभागात ही भरती केली जाणार आहे. या अभियंत्यांकडून मालमत्ता, पाणीपुरवठा, नगररचना, बांधकाम, प्रभाग हद्द, तांत्रिक विभागातील कामे करुन घेतली जाणार आहेत. बहुतांशी निवृत्त अभियंत्यांचे विकासक, ठेकेदार यांच्याशी साटेलोटे असतात. काही चौकशीच्या फेऱ्यात आहेत. त्यामुळे हे हितसंबंध काम करताना अडचणीचे ठरणार आहेत. नव्या दमाचे तरुण दिलेले काम समर्पित भावाने करुन प्रशासनाला विकासाच्या बाबतीत पुढे घेऊन जाऊ शकतात. निवृत्त अभियंत्यांकडे अनुभव गाठीशी असला तरी कामाची गती त्यांची संथच असणार आहे, असे माजी नगरसेवक बासरे यांनी सांगितले. यासंदर्भात आपण प्रशासनाला पत्र देणार आहोत, असे ते म्हणाले. अधिक माहितीसाठी सामान्य प्रशासन विभागच्या उपायुक्त अर्चना दिवे यांना तीन वेळा संपर्क केला. त्यांनी नेहमीप्रमाणे प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा : रेल्वे कामगारांच्या दक्षतेमुळे कल्याणजवळ अपघात टळला ; कल्याण-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान रुळाला तडा

कल्याण डोंबिवली पालिकेसह लगतच्या तालुका परिक्षेत्रामध्ये शेकडो नवोदित अभियंते नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. या उमद्या तरुणांना कनिष्ठ अभियंता भरतीत प्राधान्य देण्याऐवजी प्रशासन निवृत्त अभियंत्यांना प्राधान्य देऊन नक्की कसला आणि कोणाचा विकास साधणार आहे. – सचिन बासरे , माजी नगरसेवक , कल्याण

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team of retirees for the post of junior engineer in smart kalyan dombivli municipality tmb 01