अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांची माहिती
डोंबिवली : डोंबिवलीत ३९ विकासकांनी बांधलेल्या अनधिकृत इमारत प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी तात्काळ विशेष तपास पथक स्थापन करण्यात येत नसले तरी, या प्रकरणाची डोंबिवली विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त यांना काही जाणकार अधिकाऱ्यांची मदत देऊन या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार आहे, अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
हेही वाचा >>> ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती खडतरच, वसुली चांगली पण…
डोंबिवलीत मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत दाखल असलेला २७ विकासकांच्या विरुध्दचा गुन्हा चौकशीसाठी ठाणे गुन्हे शाखेने हाती घेतला आहे. रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्ह्याची चौकशी तेथील साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. या तपासाची व्याप्ती मोठी असल्याने त्यांना साहाय्य करण्यासाठी दोन-तीन साहाय्यक अधिकारी त्यांना देण्यात येतील, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मोराळे यांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास सुरू करुन प्रथम या बांधकामांची कागदोपत्री माहिती संकलित केली जाईल. या प्रकरणाशी पालिका, महारेरा, महसूल अन्य इतर शासकीय संस्था पण संबंधित आहेत. त्यामुळे या प्रत्येक संस्थेची या प्रकरणाशी असलेला संबंध, ही बांधकामे उभी राहण्याचा काळ, ही बांधकामे उभी राहत असताना स्थानिक पालिका अधिकाऱ्यांनी कोणती कार्यवाही पूर्ण केली. अशा अनेक अंगांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास केला जाईल. कागदपत्रांची उपलब्धता आणि या प्रकरणातील गंभीरता पाहून त्यानंतर हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे द्यायचे की नाही याचा विचार केला जाईल, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मोराळे यांनी सांगितले.
मानपाडा, रामनगर पोलीस ठाणे हद्दीतल एकूण ६५ विकासकांच्या विरुध्दच्या प्रकरणांचा सखोल तपास केला जाईल. या प्रकरणातील चौकशीत जे दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई केली जाईल, असे मोराळे यांनी सांगितले.
भूमाफिया गायब
आतापर्यंत स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले की भूमाफिया स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरुन या प्रकरणातून आपली सुटका करुन घेत होते. पालिका साहाय्यक आयुक्तांकडून डोंबिवली, कल्याण मधील अनेक पोलीस ठाण्यात एमआरटीपीचे गुन्हे माफियांच्या विरुध्द दाखल आहेत. या प्रकरणांमधून स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरुन सुटका करुन घेण्यात माफियांनी नेहमी धन्यता मानली. त्यांचे मनसुबे यशस्वी झाले. आता मानपाडा, रामनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यावर थेट पोलीस आयुक्त जय जीत सिंग यांचे लक्ष्य असल्याने आणि या गुन्ह्यांचा तपास ठाणे गुन्हे शाखेच्या देखरेखी खाली होणार असल्याने माफियांचे धाबे दणाणले आहेत. गुन्हे दाखल झाल्याने पोलिसांकडून अटकेची कारवाई होईल या भीतीने माफिया शहरातून गायब झाले आहेत. या प्रकरणांमध्ये महारेराची फसवणूक करण्यात आल्याने रेराचे अधिकारी पालिकेत येऊन या प्रकरणांची माहिती घेत आहेत. रेराने डोंबिवली विभागातील ५२ गृहप्रकल्पांची नोंदणी रद्द केली आहे.
एक आठवड्याच्या आत डोंबिवलीतील ६५ माफियांच्या विरुध्द फौजदारी गुन्हे दाखल झाल्याने सदनिका खरेदीदार सावध झाले आहेत. अनेक खरेदीदारांनी माफियांच्या बेकायदा इमारतींमध्ये सदनिका खरेदीला प्राधान्य दिले होते. त्यांनी आपले घर खरेदीचे इरादे बदलले आहेत.
डोंबिवलीत अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांच्या विरुध्द दाखल गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली केला जाईल. या प्रकरणांच्या प्राथमिक तपासानंतर विशेष तपास पथक यासाठी स्थापन करायचे का याचा विचार केला जाईल.
अशोक मोराळे ( अतिरिक्त पोलीस आयुक्त ठाणे)
ही दोन्ही प्रकरणे धसास लावून या प्रकरणातील रेरा, पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होईल यादृष्टीने आपण प्रयत्नशील असणार आहोत.
संदीप पाटील (वास्तुविशारद)