ठाणे : मध्य रेल्वेच्या आसनगाव आणि आटगाव रेल्वे स्थानका दरम्यान इंजिनच्या चाकामध्ये झालेला बिघाड आणि वासिंद- आसनगाव रेल्वे स्थानकामधील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने बुधवारी सकाळी कसारा दिशेकडेल रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. या बिघाडामुळे प्रवाशांचे हाल झाले. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास येथील वाहतूक पूर्ववत झाली.
मध्यरेल्वेच्या आसनगाव – आटगाव रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी १०: ३० वाजेच्या सुमारास मालगाडीच्या इंजिनच्या चाकांमध्ये बिघाड होऊन चाक जागेवरच फिरू लागले. तर वासिंद – आसनगाव दरम्यान सव्वा अकराच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे मध्यरेल्वेची कसाराच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची वाहतूक ठप्प झाली. याप्रकारामुळे एक उपनगरीय रेल्वेगाडी रद्द करण्यात आल्याने चाकरमानी प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला. सिग्नल यंत्रणेतील दुरुस्ती केल्यानंतर तसेच मालगाडीसाठी वासिंद येथून उपलब्ध करण्यात आलेले दोन इंजिन मालगाडीला पाठीमागून जोडण्यात आल्यानंतर दुपारी १२: ३० च्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाली.