मागील आठवड्यात उल्हासनगर महापालिका प्रशासनाने ओबीसी आरक्षणानुसार सोडत पूर्ण करत ओबीसी सर्वसाधारण, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला या प्रभागांची निश्चिती केली. मात्र या प्रभाग निश्चिती करत असताना घोळ झाल्याचे समजते आहे. त्यामुळे या आरक्षण सोडतीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्यानंतर आयोगाने ही सोडत पुन्हा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बुधवारी ३ ऑगस्ट रोजी ही सोडत पुन्हा पार पडणार आहे. मात्र यात फक्त सर्वसाधारण महिला प्रभागांसाठी सोडत काढली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मान्याता दिल्यानंतर गेल्या महिन्यात २९ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिकांनी ओबीसी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण केली. उल्हासनगर महापालिकेनेही ही सोडत पार पाडली. उल्हासनगर महापालिकेला ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण मिळाले. त्यानुसार गेल्या शुक्रवारी उल्हासनगर महापालिका आयुक्त अजित शेख यांच्या उपस्थितीत आणि अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या सहकार्याने ओबीसी आरक्षण सोडत पूर्ण केली गेली. यावेळी शासनाच्या नियमानुसार काही जागा ओबीसींसाठी निश्चित करण्यात आल्या. तर उर्वरित जागांसाठी चिठ्ठी पद्धतीने सोडत पूर्ण झाली. त्यानुसार २४ जागा ओबीसींसाठी आरक्षित करण्यात झाल्या. यात १२ जागा ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्या. मात्र हे करत असताना योग्य पद्धत राबवली गेली नाही. त्यामुळे या आरक्षण सोडतीच्या अहवालातून तांत्रीक चुका समोर आल्याचे राज्य निवडणूक आयोगाने उल्हासनगर महापालिका प्रशासनाला कळवले आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीची ही प्रक्रिया पूर्ण राबवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने उल्हासनगर महापालिकेला दिले आहेत.
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर उल्हासनगर महापालिकेने बुधवार ३ ऑगस्ट रोजी शहीद जनरल अरूणकुमार वैद्य सभागृहात पुन्हा एकदा आरक्षण सोडत आयोजित केली आहे. यात महिलांच्या आरक्षित जागा रद्द करून सुधारित सोडत काढली जाणार आहे. उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.