संवादाचे सर्वात जलद माध्यम असलेल्या मोबाइलने आजघडीला प्रत्येकाच्या खिशात जागा पटकावली आहे. मोबाइलच्या माध्यमातून संवादाचे जग फार जवळ आले असले तरी आता या उपकरणाच्या आरोग्यावरील घातक परिणामांची चर्चाही वाढत चालली आहे. मोबाइलमधून होणाऱ्या रेडिएशनमुळे (विद्युतचुंबकीय लहरींचा उत्सर्ग) हृदय, मेंदू यांना अपाय होत असल्याची संशोधनेही पुढे येत आहेत. या पाश्र्वभूमीवर, ‘मोबाइलद्वारे बाहेर पडणाऱ्या रेडिएशनपासून स्वत:चा बचाव करा’ अशी जाहिरात करत बाजारात ‘रेडिएशन फ्री रिसीव्हर’ दाखल झाले आहेत. जुन्या टेलिफोनच्या ‘रिसीव्हर’सारखेच दिसणारे हे उपकरण मोबाइलला जोडून मोबाइल कानाला न लावता संभाषण करता येत असल्याने अनेक ठिकाणी या उपकरणाला पसंतीही मिळत आहे.
मोबाइलमधून निघणाऱ्या किरणोत्सरांमुळे कानाला इजा पोहोचू शकते. परिणामी, बहिरेपणसुद्धा येऊ शकते, असे अनेक सर्वेक्षणांतून समोर आले आहे. हे रेडिएशन आरोग्यास घातक असल्याचा दावाही यापूर्वी अनेकदा झाला आहे. त्यामुळे मोबाइलला पर्याय शोधू पाहणाऱ्यांसाठी काही मोबाइल कंपन्यांनी आता ‘रेडिएशन फ्री रिसीव्हर’ तंत्रज्ञान बाजारात विक्रीसाठी आणले आहे.
रिसीव्हरचे दर
सुमारे सातशे रुपयांपासून ते अडीच हजार रुपयांपर्यंत रिसीव्हर बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय ‘चिनी’ बनावटीच्या ‘रिसीव्हर’ची किंमत आणखी स्वस्त आहे.
‘लॅण्डलाइन’च्या फॅशनचा सोस
सुमारे १५-२० वर्षांपूर्वी घरोघरी दूरध्वनी संच (टेलिफोन) थाटात विराजमान झालेले असायचे. त्या काळात फोन घरी असणे, हा प्रतिष्ठेचाही मुद्दा असे. पण भारतीय बाजारात मोबाइलचा शिरकाव झाल्याने आणि हळूहळू त्याचे दरही खाली येऊ लागल्यामुळे ‘लॅण्डलाइन’ हद्दपार होऊ लागला. आता तर त्याकडे एक ‘दुर्मीळ’ उपकरण म्हणूनही पाहिले जाते. या पाश्र्वभूमीवर बाजारात उपलब्ध झालेले हे ‘रेडिएशन फ्री रिसीव्हर’कडे जुनी ‘फॅशन’ म्हणूनही ओढा वाढत चालला आहे.
‘रेडिएशन फ्री रिसीव्हर’ म्हणजे काय?
पूर्वी घरोघरी टेलिफोनला रिसीव्हर असायचा. एखादा दूरध्वनी आला तर त्या रिसीव्हरमधून बोलायचे आणि ऐकायचे. त्याचप्रमाणे ‘रेडिएशन फ्री रिसीव्हर’ तयार करण्यात आला असून या रिसीव्हरची केबल मोबाइलच्या ‘ऑक्स’मध्ये जोडण्याची सुविधा दिली आहे. मोबाइलमध्ये केबल जोडताच रिसीव्हरमधून बोलता आणि ऐकता येते. मात्र, रिसीव्हरमधून मोबाइलमधील विद्युत चुंबकीय लहरी बाहेर पडत नसल्यामुळे कानाला त्रास होत नाही, असा या कंपन्यांचा दावा आहे. शिवाय कार्यालयात एकाच जागी बसून काम करणाऱ्यांसाठीही हे उपकरण सोयीचे ठरत आहे.
नीलेश पानमंद, ठाणे</strong>