कल्याण : स्टेम वाॅटर वितरण कंपनी नियंत्रित टेमघर येथील जलशुध्दीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी एक जलवाहिनीला शहाड ते टेमघर दरम्यानच्या कल्याणमधील सापाड येथे शुक्रवारी दुपारी गळती लागली आहे. या गळतीमधून शेकडो लीटर पाणी फुकट जात आहे. ही जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी टेमघर जलशुध्दीकरण केंद्राचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होणाऱ्या ठाणे, भिवंडी परिसराला पाणी टंचाईची झळ बसणार आहे.
गळती लागलेल्या भूमिगत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी १५ तासांचा अवधी लागण्याची शक्यता स्टेम वाॅटर वितरण कंपनीकडून व्यक्त करण्यात आली आहे. टेमघर येथील जलशुध्दीकरण केंद्राला कल्याणमधील शहाड येथून एक जलवाहिनीद्वारे कच्च्या (अशुध्द) पाण्याचा पुरवठा केला जातो. ही भूमिगत जलवाहिनी एक हजार ८५० मिलीमीटर व्यासाची आहे. शुक्रवारी दुपारी शहाड ते टेमघर दरम्यानच्या भूमिगत जलवाहिनीला कल्याण जवळील सापाड भागात मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. त्यामुळे टेमघर जलशुध्दीकरणाला पाणी पुरवठा होणाऱ्या केंद्राला त्याची झळ बसली. या केंद्राचा पाणी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.
या गळतीमुळे शेकडो लीटर पाणी वाया गेले. या गळतीची माहिती मिळताच स्टेम वाॅटर वितरण कंपनीचे देखभाल व दुरुस्तीचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. हे काम जमिनीखालील असल्याने या कामात अनेक अडथळे येत आहेत. गळती झालेली जलवाहिनी बदलून तेथे नवीन जलवाहिनी टाकावी लागणार आहे. या कामासाठी देखभाल कर्मचाऱ्यांना सुमारे १२ ते १५ तासाचा अवधी लागण्याची शक्यता स्टेम वाॅटर वितरण कंपनीकडून वर्तविण्यात आली आहे. हे काम विहित वेळेच्या अगोदर पूर्ण करण्याचा मानस असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.