लोकसत्ता प्रतिनिधी
बदलापूर : शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातल्या बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर शनिवारी जिल्ह्यात पुन्हा उन्हाळा परतल्याचे चित्र होते. ठाणे जिल्ह्यातील पारा ४० अंश सेल्सियस पार गेला होता. बदलापुरात दुपारी अडीचच्या सुमारास ४०.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासकांनी दिली आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने पुन्हा घामांच्या धारांचा अनुभव येत होता.
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी गारांसह जोरदार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान करणाऱ्या या अवकाळी पावसाने नागरिकांचेही हाल केले. ठाणे जिल्ह्यात शहापूर, मुरबाड, भिवंडी या तालुक्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यावेळी शहापुरच्या खर्डी आणि आसपासच्या भागात गाराही पडल्या. तर त्याचवेळी बदलापूर, अंबरनाथ या शहरांमध्ये तुरळक सरी आल्या.
मात्र डोंबिवली, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये धुळीचे लोट पाहायला मिळाले. समाज माध्यमांवर याचे अनेक चित्रणे प्रसारीत झाली होती. या सर्व प्रकारामुळे जिल्ह्यातील सरासरी तापमान खाली आले होते. चार दिवस तापमानात काही अंशी घटही दिसून आली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता.
पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट
मात्र शनिवारी वातावरणात बदल जाणवले. सकाळपासूनच तापमानात वाढ दिसून येत होती. बदलापुरात दुपारी अडीचच्या सुमारास पारा ४० अंश सेल्सियस पार गेला होता. जिल्ह्यातल्या बहुतांश शहरांमध्ये हीच परिस्थिती होती. उत्तरेतून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे पुन्हा तापमानात वाढ झाल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. येत्या चार ते पाच दिवस राज्यातल्या विविध भागात तापमानात वाढ जाणवेल, असा अंदाज मोडक यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे जिल्ह्यातल्या काही भागात उष्णतेची लाट पसरल्याचा अनुभव येईल, असेही मोडक म्हणाले. मार्च महिन्यात काही दिवस तापमान ४० अंश सेल्सियस पार गेले होते. आता पुन्हा तसा अनुभव येणार आहे.
४३ अंश सेल्सियपर्यंत वाढणार तापमान
उत्तरेतून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे काही भागात कालच्या तापमानापेक्षा चार किंवा त्यापेक्षा अधिक अंश सेल्सियस तापमान वाढल्याचे जाणवेल असेही त्यांनी सांगितले आहे. तर कोकण पट्ट्यातील बहुतांश भागात तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत वाढू शकते. समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांवरून तापमानात घट कधी होईल हे ठरेल, असेही मोडक म्हणाले. गेल्या काही वर्षात समुद्रापासून दूर असलेल्या शहरांमध्ये तापमानात अधिक वाढ दिसून आली आहे. सोबतच समुद्राकडून येणारे वारे तापमानात घट करण्यास मदत करतात. त्यांच्या वेळेवरही तापमानाचे गणित अवलंबून आहे.