बदलापूरः गेल्या आठवड्यात ३६ अंश सेल्सियस पार गेलेले तापमान बुधवारी सकाळी पुन्हा घसरले. त्यामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तापमानात मोठी घट पहायला मिळाली. पालघरमधील मनोर येते १२.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. तर ठाणे जिल्ह्यात बदलापूर शहरात सर्वात कमी १३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तापमानातील ही घट तात्पुरती असून येत्या काळात तापमान वाढीची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

यंदाच्या मोसमात हिवाळा अगदी काही दिवस जाणवला. तापमानात होणारे बदल, पश्चिम विक्षोभ यामुळे काही काळ थंडी जाणवली. मात्र ती अधिक काळ दिसली नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात काही दिवस गारव्याचे जाणवले. मात्र जानेवारी महिन्यात तापमानाचा पारा ३४ अंश सेल्सियस पर्यंत गेला होता. तर फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात ठाणे, पालघर जिल्ह्यात तापमान वाढले होते. त्यामुळे थंडी गायब झाली की काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र पुन्हा पश्चिम विक्षोभाचा प्रभाव वाढल्याने बुधवारी तापमानात घट झाल्याचे दिसून आले. बुधवारी सकाळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तापमानात घट नोंदवली गेली. पालघर जिल्ह्यात मनोर, पालघर येथे पारा १२.८ अंश सेल्सियस पर्यंत खाली आला होता. तर ठाणे जिल्ह्यात बदलापूर शहरात सर्वात कमी १३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. शेजारच्या कर्जत तालुक्यातही १३.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद खासगी हवामान अभ्यासकांनी केली. दोन्ही जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये तापमानात घट नोंदवली गेली. सकाळी तापमानाचा पारा कमी असला तरी दुपारचे तापमान मात्र ३६ अंश सेल्सियस पर्यंत कायम होते. त्यामुळे ही तापमानातील घट अवघ्या काही दिवसांसाठी असेल अशी माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.

प्रतिक्रियाः सध्याचा काळ हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे सरकण्याचा काळ आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटे थंडी जाणवली तरी दुपारी मात्र तापमानात वाढ झाल्याचे दिसून येईल. बुधवारी सकाळी तापमानात घट होती. मात्र ही घट काही दिवसांसाठीच असेल. येत्या काळात पश्चिम विक्षोभ प्रभाव कमी झाल्याने तापमानात वाढ दिसेल. जानेवारीच्या अखेरपर्यंत जो पारा ३७ अंश सेल्सियसपर्यंत वाढला होता. तो पारा आता ३८ ते ३९ अंश सेल्सियसपर्यंत वाढेल, अशीही शक्यता आहे. अभिजीत मोडक, खासगी हवामान अभ्यासक.

शहरनिहाय तापमान

मनोर – पालघर १२.८

बदलापूर – १३

 कर्जत – १३.८

अंबरनाथ १४.५

कल्याण १५.३

पनवेल १५.७

डोंबिवली १५.७

ठाणे १६

नवी मुंबई १६

Story img Loader