भिवंडी जवळील कोन गावातील रस्त्यावर गेल्या आठवड्यात पहाटेच्या वेळेत सकाळच्या वेळेत फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ सरकारी वकिलाला एका अनोळखी टेम्पो चालकाने भरधाव वेगाने धडक दिली होती. या धडकेत सरकारी वकिलाचा जागीच मृत्यू झाला होता. टेम्पो चालक घटनास्थळा वरुन पळून गेल्याने आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान कोन पोलिसांसमोर होते.पांडुरंग रुपला राठोड (६५, रा. गणेशनगर, कोनगाव, भिवंडी) असे मयत सरकारी वकिलाचे नाव आहे.
हेही वाचा – डोंबिवली : शिळफाटा रस्त्यावरील काटई चौकातील कोंडी सोडविण्यासाठी रस्ते कामाला सुरुवात
मागील दहा दिवसाच्या कालावधीत कोन पोलिसांनी कोन, कल्याण, भिवंडी रस्त्यांवरील एकूण २५ ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रण तपासले. अपघात घडला त्या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे आव्हान होते. अपघात घडला त्यावेळी मोटार, ट्रक, टेम्पो, अवजड वाहने त्या ठिकाणीहून गेली. या वाहनांमधील २० वाहनांची तपासणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन, त्या चालकाची चौकशी केली. या वाहनांच्या मध्ये टेम्पोच्या बाह्य भागावर मदर डेअरी नाव लिहिलेला एक टेम्पो अपघात स्थळावरुन भरधाव वेगाने जात असल्याचे चित्रीकरणात पोलिसांना दिसले. मदर डेअरी कंपनी सरवली एमआयडीसीत असल्याने पोलिसांनी या कंपनीच्या प्रवेशव्दारावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यावेळी कोन गावात अपघात घडला पाच वाजून तीन मिनिटांनी आणि अपघात करणारा टेम्पो पुढील तीन मिनिटात कंपनीच्या आवारात प्रवेश करत असल्याचे पोलिसांना चित्रीकरणातून समजले. त्यामुळे मदर इंडिया टेम्पो चालकानेच पांडुरंग राठोड यांना धडक दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले.पोलिसांनी टेम्पो चालक कामरान हैदरअली अन्सारी (२८, रा. औचित पाडा, भिवंडी) याला मोबाईलवरुन संपर्क केला. त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन आपण अशाप्रकारचा टेम्पो चालविला नाही आणि अपघात केला नसल्याचे उत्तर दिले. पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा तांत्रिक माहितीच्या आधारे माग काढला. त्याला बुधवारी भिवंडीतून ताब्यात घेऊन त्याला कोन गाव पोलीस ठाण्यात आणले. त्याची चौकशी सुरू करताच त्याने कोन गावात सोमवारी पहाटे आपल्या हातून अपघात घडल्याची कबुली दिली. पोलिसांनी कामरान अन्सारीवर गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी आरोपीला पकडल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. पांडुरंग राठोड यांनी शासनाच्या अनेक न्यायालयीन प्रकरणांमध्ये सरकारी अभियोक्ता म्हणून काम पाहिले आहे. पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, साहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली कोन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, साहाय्यक पोलीस निरीक्षक किरणकुमार वाघ यांच्या तपास पथकाने आरोपीला पकडण्यात महत्वाची कामगिरी केली.