कल्याण – १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांना एप्रिल २०२५ पूर्वी शासनाने उच्च सुरक्षा नोंदणी वाहनपट्टी बसविण्याचे बंधन घातले आहे. एप्रिलनंतर अशाप्रकारची वाहनपट्टी नसणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याने एक हजार रूपये दंड वसूल करण्यात येणार आहे. अधिकाधिक वाहन चालकांंनी विहित वेळेत ही उच्च सुरक्षा नोंदणी वाहन पट्टी बसवावी म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कल्याण विभागाने कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी परिसरात एकूण १० केंद्रे सुरू केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शासनाच्या परिवहन विभागाने उपप्रादेशिक परिवहन विभाग कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वाहनांना उच्च सुरक्षा वाहन पट्टी बसविण्याचे काम मेसर्स रिअल माझाॅन इंडिया लिमिटेड या एजन्सीला दिले आहे. मेसर्स रिअल माझाॅन एजन्सीने वाहन चालकांना आपल्या परिसरात उच्च सुरक्षा वाहन पट्टी बसविण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून एमएच-०५ वाहन क्रमांक असणाऱ्या वाहनांसाठी कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ परिसरात केंद्रे सुरू केली आहेत.

उच्च सुरक्षा नोंदणी वाहन पट्टी बसविण्यासाठी दुचाकी, ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तीन चाकी वाहनांसाठी ५०० रूपये शुल्क आणि हलकी वाहने, मोटार, प्रवासी वाहतुकीची वाहने, जड, ट्रेलर या वाहनांसाठी ७४५ रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणे, छेडछाड व बनावटगिरी रोखणे, रस्त्यावरून धावणाऱ्या सर्व वाहनांची झटपट ओळख पटविण्यासाठी, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ही उच्च सुरक्षा नोंदणी वाहन पट्टी महत्वाची भूमिका बजावणार आहे.

वाहन पट्टी बसविण्याची केंद्रे

डोंबिवली – ॲक्रिलिक इंडस्ट्री, ए, ५७, एमआयडीसी, डोंबिवली. बदलापूर – न्यू वडवली बारवी धरण रस्ता, गावदेवी मंदिराच्या पाठीमागे, बदलापूर पश्चिम, उल्हासनगर – साई पाॅईन्टस ऑटोमोबाईल, कोहिनूर व्हेव्ज, शांंतीनगर, कल्याण-अंबरनाथ रस्ता, उल्हासनगर, अंबरनाथ – स्वस्तिक होंडा, पनवेलकर प्राईड, कानसई रस्ता, हुतात्मा चौक, कानसई सेक्शन, अंबरनाथ, बदलापूर – स्वस्तिक होंडा, बदलापूर काटई रस्ता, वेनकी हाॅटेलसमोर, कात्रप, बदलापूर. उल्हासनगर- स्वस्तिक होंडा, मोहन पॅलेस, कल्याण मुरबाड रस्ता, वरप-म्हारळ, उल्हासनगर. अंबरनाथ- स्वस्तिक होंडा, प्लॉट क्रमांक बी ९-२, ऑर्डनन्स फॅक्टरी समोर, एमआयडीसी, कानसई, अंबरनाथ, उल्हासनगर – स्वस्तिक होंडा, रिजन्सी प्लाझा, शांतीनगर, उल्हासनगर. भिवंडी – पुलानी इंजिनीअर्स, मुंबई -नाशिक महामार्ग, फेडेक्स वेअरहाऊसजवळ, वडपे पोलीस ठाण्याजवळ, भिवंडी, कल्याण – रिजन्ट होंडा, तलाठी सजा कोन, कल्याण-भिवंडी रस्ता, प्रेचिहोले जवळ, कल्याण.

उच्च सुरक्षा नोंदणी वाहनपट्टी वाहन चालकांना आपल्या परिसरात बसवता यावी म्हणून उपप्रादेशिक परिवहन कल्याण कार्यालयांतर्गत येणाऱ्या एमएच-०५ वाहनांसाठी एकूण १० केंद्रे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंंबरनाथ, भिवंडी परिसरात सुरू करून देण्यात आली आहेत. मे. रिअल माझाॅन एजन्सीच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. अधिकाधिका वाहनांनी ३० एप्रिल २०२५ पूर्वी ही सुरक्षा वाहन पट्टी बसवून घ्यावी. आशुतोष बारकुल- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण.