लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : लोकसभा निवडणुकीनंतर स्थानिक प्रशासन यंत्रणांनी राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानामुळे कल्याण, डोंबिवली मतदारसंघातील मतदार संख्या विधानसभा निवडणुकीपर्यंत २५ ते ५५ हजारापर्यंत वाढली. जुन्या आणि नवोदित मतदारांनी केलेल्या उत्स्फूर्त मतदानामुळे कल्याण पूर्व, पश्चिम, ग्रामीण डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का ११ ते १५ टक्क्यापर्यंत वाढला. चारही मतदारसंघातील मतदानाची एकूण टक्केवारी १३.७३ टक्के आहे.
मागील दहा वर्षाच्या कालावधीपेक्षा यंदा प्रथमच विधानसभा निवडणुकीतील टक्केवारी वाढल्याने कल्याण, डोंबिवलीतील चारही मतदारसंघातील उमेदवारांमध्ये हे वाढीव मतदान कोणाला पडणार याविषयी हुरहुर लागली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक पक्षीय उमेदवाराबरोबर, सग्यासोयऱ्यांचे राजकारण, बंडखोरी, प्रतिष्ठेच्या मुद्द्यावर लढवली गेली.
डोंबिवली मतदारसंघ
डोंबिवली विधानसभा मतदारसंघात मागील दहा वर्षाच्या कालावधीत ४४ ते ४६.५८ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत हे मतदान ५६.१९ टक्के झाले. १५.४७ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. मतदार नोंदणी अभियानामुळे डोंबिवलीतील मतदार सुमारे २७ हजाराने वाढला. या मतदारसंघात एकूण तीन लाख १३ हजार मतदान आहे. यंदा एक लाख ७५ हजार मतदान झाले. या वाढीव टक्क्याची विभागणी भाजपचे उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण, ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांच्यात किती होते. म्हात्रे यांना किती मतदान होते आणि मंत्री चव्हाण यांना किती मताधिक्य मिळेल याविषयीची चर्चा राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
कल्याण पूर्व
कल्याण पूर्व मतदारसंघात मागील दहा वर्षात ४०.८२ ते ४५ टक्के मतदान झाले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदान ५८.५० म्हणजे १४.९७ टक्क्यांनी वाढले. एकूण तीन लाख २९ हजार मतदारांपैकी एक लाख ९२ हजार ५६६ मतदारांनी येथे मतदानाचा हक्का बजावला. महायुतीच्या सुलभा गायकवाड, ठाकरे गटाचे धनंजय बोडारे, अपक्ष महेश गायकवाड आणि वंचितचे विशाल पावशे हे येथे रिंगणात आहेत. खरी लढत सुलभा, बोडारे आणि महेश यांच्यात आहे. मतवाढीचा लाभ सुलभा गायकवाड, बोडारे आणि महेश यांना किती होतो याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
कल्याण ग्रामीण
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात दहा वर्षात मतदानाचा आकडा ४७ ते ४८ टक्क्यांपर्यंत स्थिरावला होता. यंदा या मतदारसंघात ५७.८१ मतदान झाले. ही वाढ मागच्या तुलनेत ११.४५ टक्के आहे. या मतदारसंघात पाच लाख १० हजार मतदार आहेत. यापैकी दोन लाख ९४ हजार मतदारांनी यंदा मतदान केले. या मतदारसंघात मागच्या पाच महिन्यात सुमारे ५५ हजार नवमतदार वाढले. ठाकरे गटाचे सुभाष भोईर, मनसेचे राजू पाटील, शिंदेसेनेचे राजेश मोरे यांच्यात येथे चुरशीची लढत आहे.
कल्याण पश्चिम
कल्याण पश्चिम मतदारसंघात यापूर्वीच्या दहा वर्षात ४१.९१ ते ४४.९६ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघातील चार लाख ४० हजार मतदारांपैकी यंदा दोन लाख ४३ हजार मतदारांनी मतदान केले. यंदा या मतदारसंघात ५४.७५ म्हणजे ११.१७ टक्के वाढीव मतदान झाले. शिंदेसेनेचे विश्वनाथ भोईर, ठाकरे गटाचे सचिन बासरे यांना या वाढीव टक्क्याचा किती लाभ होतो यावर त्यांचे भवितव्य आहे.