लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली-कल्याणमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या परिसरात पक्षीय कार्यकर्त्यांनी मतदारांना माहिती देण्यासाठी बूथ उभारले होते. या बूथच्या ठिकाणी मंडप उभारण्यात आले होते. मतदान होऊन सहा दिवस उलटले तरी पक्षीय कार्यकर्त्यांनी हे मंडप न काढल्याने त्यांचा वाहतुकीला अडथळा येत आहे. या मंडपांच्या ठिकाणी आता दुचाकी, रिक्षा चालक निवारा म्हणून वाहने उभी करत आहेत. वर्दळीच्या रस्त्यांवर हे मंडप आहेत. त्यामुळे वाहन चालकांना या मंडपांचा अडथळा येत आहे. या मंडपांचे आधार खांब रस्त्यावर असल्याने अवजड वाहन या भागातून जात असेल तर त्याठिकाणी वाहन कोंडी होते.

डोंबिवलीत अरूंद अशा महात्मा फुले रस्त्यावर, पालिका ह प्रभागाच्या कार्यालय परिसरात मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर पक्षीय कार्यालयांचे मंडप उभे आहेत. अशीच परिस्थिती कल्याणमध्ये अनेक ठिकाणी आहे. हे मंडप काढून नेण्याची जबाबदारी पक्षीय कार्यकर्त्यांची आहे. परंतु, मतदान संपल्यानंतर कार्यकर्ते निघून गेले आणि मंडप आहे त्याठिकाणीच राहिले असल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा-विरोधक मुक्त मतदारसंघाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष

काही मंडप हे रिक्षा वाहनतळांच्या बाजुला आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांना वाहनतळावर रिक्षा उभ्या करताना या मंडपांचा अडथळा येत आहे. पक्षीय कार्यकर्त्यांनी हे मंडप उभारले आहेत. त्यामुळे पालिका कर्मचारी या मंडपांवर थेट कारवाई करताना दिसत नाहीत. थेट कारवाई केली तर अनावश्यक वाद उद्वभवेल अशी भीती कर्मचाऱ्यांना वाटते. काही ठिकाणचे मंडप मोठे आहेत. त्याठिकाणी वाहनांना उन लागू नये म्हणून मोटारी उभ्या करून ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिक, रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहेत.

पालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाने रस्ते अडवून उभ्या असणाऱ्या मंडपांवर कारवाई सुरू करावी, अशी मागणी नागरिक, वाहन चालकांकडून केली जात आहे.

Story img Loader