ठाणे : भिवंडी येथील ठाणगेआळी भागात एअर गनने (बनावट बंदूक) परिसरात दहशत माजविल्याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तुषार खारेकर (२४), कृष्णा चव्हाण (२९) आणि विशाल भोईर (२८) या तिघांना ठाणे पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी या टोळीतील एकाकडून एअरगन जप्त केली आहे. ही एअरगन ॲमेझाॅन या संंकेतस्थळावरून खरेदी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणगेआळी भागात दोन गटांमध्ये शनिवारी वाद झाले होते. या वादातून दोन्ही गटाने निजामपूरा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या. या तक्रारींच्या आधारे दोन्ही गटांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी सायंकाळी पोलिसांकडे एक चित्रीकरण प्राप्त झाले. या चित्रीकरणामध्ये तक्रार देणाऱ्या गटातील एका व्यक्तीच्या हातामध्ये पिस्तुल दिसत होती. तसेच तो नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत होता.
हेही वाचा – कल्याणमध्ये भव्य सीटी पार्क, गौरीपाडा येथे मनोरंजन, विरंगुळ्याचे प्रशस्त ठिकाण
हेही वाचा – डोंबिवलीत ओला चालकाला प्रवाशाची मारहाण
उल्हासनगर येथील गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. पुन्हा अशाप्रकारचे चित्रीकरण प्रसारित होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, भिवंडी परिमंडळाचे उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी तत्काळ याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. निजामपुरा पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता, तुषार खारेकर, कृष्णा चव्हाण आणि विशाल भोईर यांची नावे समोर आली. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी कृष्णा याच्याकडे पिस्तुलच्या बनावटीची एअरगन आढळून आली. ही एअरगन मिखंज पटेल याची असून त्याने ती ॲमेझाॅन कंपनीच्या संकेतस्थळावरून विकत घेतल्याचे समोर आले. पोलीस मिखंज पटेल याच्यासह त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.