लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण – येथील वालधुनी भागातील अशोकनगर परिसरात मंगळवारी रात्री तीन तरूणांनी एका रहिवाशाला अडवून पैसे मागितले. त्याने नकार देताच त्याला लोखंडी सळ्या, दगड, काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत कोणी मध्यस्थी केली, कोणी घराच्या बाहेर आले तर त्याला ठार मारण्याची धमकी तिघांनी दिली.
या तरूणांच्या दहशतीने अशोकनगर, वालधुनी भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या तरूणांचा पोलिसांनी कायमस्वरुपी बिमोड करण्याची मागणी वालधुनी भागातील नागरिकांकडून केली जात आहे.
रोहित उर्फ बाळा अशोक उबाळे, मोन्या उर्फ रोहित विजय गायकवाड, विशाल सुनील जाधव अशी मारहाण करणाऱ्या अशोकनगर मधील तरूणांची नावे आहेत. महात्मा फुले पोलीस ठाण्यात या तरूणांविरुध्द याच भागातील रहिवासी आनंद घाडगे (४५) यांनी तक्रार केली आहे.
आणखी वाचा-भिवंडी महापालिकेच्या साहाय्यक आयुक्तांना धक्काबुक्की
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार आनंद घाडगे मंगळवारी रात्री भोजन झाल्यावर अशोकनगर भागातील घर परिसरात फेरफटका मारत होते. त्यांना आरोपींनी अडविले. त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. आनंद यांनी नकार देताच, आरोपींनी आनंद यांना पकडून भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांना लोखंडी सळईने मारहाण केली. आनंद यांना जबरदस्तीने खाली पाडून त्यांच्या खिशातील साडे आठशे रूपये आरोपींनी काढून घेतले. आनंद यांना मारहाण होत असल्याने त्यांना वाचविण्यासाठी काही रहिवासी पुढे आले. त्यांना मध्ये पडलात तर ठार मारण्याच्या धमक्या आरोपी तरूणांनी दिल्या. आनंद जीव वाचविण्यासाठी पळू लागले तर त्यांच्यावर आरोपींनी दगडफेक केली. दगडफेकीतील दगडी काही रहिवाशांच्या घरावर पडल्याने ते रहिवासी जागे झाले. त्यांनाही तरूणांनी धमक्या दिल्या.