डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीतील आजदेपाडा भागात शनिवारी मध्यरात्री तीन तरुण तलवारी घेऊन परिसरात दहशत माजवत असल्याचा प्रकार समाज माध्यमातील चित्रफितीमधून उघडकीला आला आहे. आजदेपाडा भागातील काही घरांसमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये या तरुणांच्या दहशतीचा प्रकार कैद झाला आहे.
या तरुणांची ओळख पटवून मानपाडा पोलिसांनी या तिन्ही तरुणांना अटक करावी, अशी मागणी आजदेपाडा भागातील नागरिकांनी केली आहे. रविवारी मध्यरात्री सुरुवातीला दोन तरुण एका घराच्या बाहेरून पळत होते. त्यांच्या पाठोपाठ आणखी एक तरुण हातात तलवार घेऊन एक अरुंद गल्लीतून पळत होता. हे तरुण पळत असल्याने या भागात आडोशाला बसलेली भटकी कुत्री भुंकायला लागली म्हणून काही रहिवाशांंनी दरवाजा उघडून बाहेर पाहिले तर काही तरुण हातात तलवार घेऊन पाठोपाठ धावत असल्याचे दिसून आले. हे तरुण ज्या गल्लीमधील रस्त्याने धावत गेले. त्याच रस्त्याने ते पुन्हा काही वेळाने हातात तलवारी घेऊन परत आले. त्यामुळे पूर्ववैमनस्यातील एखाद्याचा काटा काढण्यासाठी तरुणांनी ही कृती केली असावी असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा – पावसाचे पाणी उपसण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानक भागात पाणी उपशाचे तीन पंप
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचे हे समर्थक आहेत का याचाही तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी होत आहे. येणाऱ्या विधानसभा, पालिका निवडणुका, बेकायदा बांधकामांवरून सुरू असलेले भूमाफियांमधील वाद अशा अनेक कारणांवरून काही मंडळी आता दहशतीचा अवलंब करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.