ठाणे – ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तलवारी, कोयते हातात घेऊन दहशत पसरविणाऱ्या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. तेजस हरूगले, अप्पा चौघुले आणि सागर दळवी अशी अटकेत असलेल्या तरुणांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्तकनगर, लोकमान्य नगर, वागळे इस्टेट भागात पाच ते सहा तरुण कोयते, तलवारी घेऊन फिरत होते. सर्व तरुणांच्या चेहऱ्यावर मुखपट्टी आणि रुमाल बांधलेले होते. ते येथील एका कार्यालयात शिरले. कार्यालयामध्ये सात ते आठ संगणक होते. दोन तरुण त्या कार्यालयामध्ये असताना, त्या दोघांना त्या हल्लेखोरांनी मारहाण सुरू केली. त्यांच्या हातातील शस्त्रास्त्र पाहून कर्मचाऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी या कार्यालयातील संगणकांची देखील नासधूस केली. एक व्यक्ती त्याठिकाणी आल्यानंतर तो त्या तरुणांना बाहेर घेऊन जाताना दिसत होते. या घटनेचे चित्रीकरण कार्यालयातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले. त्या हल्लेखोरांनी जाताना सीसीटीव्ही कॅमेरा देखील फोडला होता. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण समाज माध्यमाद्वारे प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली.

सुरुवातीला हे प्रकरण वागळे इस्टेट भागातील असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी तेथे तपासणी सुरू केली. हे तरुण वर्तकनगर, लोकमान्यनगर पाडा येथील असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे अन्वेषण सुरु होता. या प्रकारणातील तीन जण ठाण्यात लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने यातील तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांची पोलीस कोठडी मिळाली असून त्यांच्या इतर साथिदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. हल्लेखोर हे सराईत गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांच्या कडून कोयते आणि तलवारी जप्त केल्या आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. हा प्रकार पूर्व वैमन्यस्यातून झाला आहे का या दिशेने देखील पोलीस तपास सुरू आहे.