कल्याण: कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करताना मतदारसंघात भाजप आणि महायुतीचे मित्र पक्ष श्रीकांत यांना विजयी करतील अशी घोषणा केली होती. आमदार गणपत गायकवाड समर्थकांच्या भूमिकेमुळे कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला होता. मात्र नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर आणि गणपत गायकवाड यांच्या पत्नी एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारामुळे येथे शिवसेना आणि भाजपात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने गायकवाड गटाला लक्ष्य केले होते. आता लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेनेचे नियोजित उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ श्रीकांत शिंदे प्रचारात व्यस्त आहेत. त्यात भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्यासोबत भाजप नेते आणि पदाधिकारीसुद्धा सक्रिय झाले आहेत. मात्र अशातच काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेचे तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेत गुंड प्रवृत्तीचे समर्थक अपप्रचार करत महायुतीत मिठाचा खडा टाकणार असतील तर त्याचे परिणाम शेजारच्या मतदारसंघात पाहायला मिळतील असा इशारा दिला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी श्रीकांत शिंदे शिवसेनेचे उमेदवार असतील आणि महायुती त्यांना विजयी करेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी पुढे येत श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत कल्याण पूर्व मतदारसंघात मतभेद नसल्याचे बोलले जात होते. मात्र गुढीपाडव्याच्या निमित्ताने कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड आयोजित नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे सहभागी झाल्या. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाडसुद्धा उपस्थित होत्या. याबाबत समाजमाध्यमांवर छायाचित्रही प्रसारित झाले. त्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधान आले आहे.
हेही वाचा – कल्याण लोकसभेत ‘ईडी’ची पीडा टाळण्यासाठी ठाकरे गटाच्या पुरुष उमेदवारांची माघार?
हेही वाचा – भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरी, काँग्रेसचे इच्छुक नीलेश सांबरे लढविणार निवडणूक
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थक आणि ठाकरे गट यांच्यात छुपी युती तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो आहे. यामुळे स्थानिक पातळीवर पुन्हा महायुतीत गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त होते आहे.