ठाणे : कल्याण लोकसभेची उमेदवार श्रीकांत शिंदे असतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परस्पर जाहीर केल्याने याच मुद्द्यावरून ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथून जाहीर केली. आम्हीच खरी शिवसेना म्हणणाऱ्या शिंदेंची उमेदवारी भाजप जाहीर करते, यातच सर्व काही आले. डुप्लिकेट ते डुप्लिकेट असते असे ठाकरे गटाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे म्हणाले.
ज्यांच्या ताब्यात चोरलेला पक्ष आणि चिन्ह आहे ते स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करू शकत नाहीत. त्यांच्या मुलाची उमेदवारी भाजपच्या नेत्यांना जाहीर करावी लागते. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली.
जगाच्या इतिहासात ही कदाचित पहिली घटना असेल की दुसऱ्या पक्षाची उमेदवारी तिसराच पक्ष जाहीर करतोय, मग त्या पक्षाचे नेते करतात काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ज्याअर्थी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे त्याअर्थी शिंदे गट ही खरी शिवसेना नाही हे भाजपनेच मान्य केले असेही रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे कल्याणच्या उमेदवारीवरून श्रीकांत शिंदे यांना ठाकरे गट कोंडीत पकडत असल्याचे चित्र आहे.