कल्याण – कल्याण, डोंबिवली शहरातील नागरिकांच्या नागरी समस्या, विकासाचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये महिन्यातून एकदा जनता दरबार घ्यावेत, अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवलीतील जिल्हाप्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी केली आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे, नवी मुंबई शहरांमध्ये जनता दरबार घेण्यास सुरूवात केली आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून त्या शहरांंमधील नागरी समस्या, विकासाचे प्रश्न याविषयीच्या तक्रारी, माहिती शासनाकडे पोहचते. मंत्र्यांच्या माध्यमातून नागरी समस्या, विकासाचे अनेक प्रश्न नागरिकांच्या तक्रारींच्या माध्यमातून मार्गी लागण्यास मदत होते. कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये मागील अनेक वर्षापासून नागरी समस्या, विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. गेल्या पंधरा ते वीस वर्षात या भागातील आपल्या पक्षातील लोकप्रतिनिधींनी शहरासाठी किती कामे केली. किती विकासाचे प्रश्न मार्गी लावले या जनता दरबाराच्या माध्यमातून वनमंत्री गणेश नाईक यांना कळेल, असे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी म्हटले आहे.
कल्याण डोंबिवली शहरांमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे सुरू आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर विकासाचा प्रकल्प काही वर्षापूर्वीच मंजूर आहे. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ठाकुर्ली उड्डाण पुलाचा ९० फुटी रस्त्याकडे जाणारा उड्डाण पूल पाच वर्षापासून रखडला आहे. डोंबिवली, कल्याण शहरातील अनेक महत्वाचे रस्ते वाहतूक कोंडीचा विचार करून रस्तारूंदीकरण होणे आवश्यक आहेत.
मोठागाव, कोपर, भोपर, काटई ते काटई चौक, हेदुटणे भागातून जाणाऱ्या बाह्य वळण रस्त्यासाठी भूसंपादन होणे आवश्यक आहे. टिटवाळा ते हेदुटणे बाह्य वळण रस्ते मार्गातील हा एक महत्वाचा टप्पा मागील पंधरा वर्षापासून रस्ते कामासाठी जमीन मोजणी आणि भूसंपादना अभावी रखडला आहे. मोठागाव रेल्वे फाटकावरील उड्डाण पूल, पलावा चौकातील दोन पूल, शिळफाटा रस्त्यावरील कल्याण फाटा, काटई चौक आणि रिजन्सी अनंतम समोरील उड्डाण पुलाची कामे शासनाकडून मंजूर आहेत. या कामांचा शुंभारंभ करण्यात आला आहे. प्रत्यक्षात या कामांची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. हे सर्व प्रश्न जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या माध्यमातून पुढे येण्याची शक्यता आहे. हे प्रश्न जनता दरबारात आले तर ते शासन पातळीवर पोहचून शासनाला त्याची दखल घ्यावी लागेल. त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांनी कल्याण, डोंबिवलीत लवकरच जनता दरबार सुरू करावा, अशी मागणी जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सुरू केली आहे.
यापूर्वीच्या सरकारच्या काळात असताना ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री वनमंत्री गणेश नाईक कल्याणमध्ये अत्रे रंंगमंदिर, डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात जनता दरबार घेत असत.