ठाणे : ठाणे महापालिकेच्या हद्दीत येत असलेल्या दिवा शहराची लोकसंख्या पाच लाखाच्या पुढे गेली असून येथील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिव्याला स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाने ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, विजय देसाई, शहर प्रमुख सचिन पाटील, प्रकाश तेलगोटे, विजय कदम, लहू चाळके, रवींद्र सुर्वे, कलवा शहर संघटिका कल्पना कवले, मुंब्रा शहर संघटिका शाहीन घडीआली, उपशहर प्रमुख अनिश कुरेशी आदी उपस्थित होते.
दिवा परिसरातील नागरिकांसाठी मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा चौकी उभारण्यात आलेली आहे. या पोलीस स्टेशनमध्ये पंचवीस ते तीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे दिव्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. चरस, गांजा,हकीम यासारख्या व्यसनाला येथील तरुण मंडळी आधीन जाताना दिसत आहेत. महिलांच्या तक्रारी सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. चोरी, दरोडे यासारखे प्रकार दिव्यात सरसपणे होताना दिसत आहेत, असा दावा ठाकरे गटाने निवेदनात केला आहे.
पंचवीस हजार लोकसंख्येच्या मागे एक पोलीस अशी दैन्य अवस्था दिवा चौकीचे असून दिव्यातील लोकांना तक्रार करायची असल्यास त्यांना दहा किलोमीटरवर असलेल्या मुंब्रा पोलीस ठाण्यात जावे लागते. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेले कित्येक वर्ष दिवा पोलीस स्टेशन व्हावे म्हणून आम्ही वारंवार मागणी करत आहोत. परंतु जागेचा अभाव सांगून ही मागणी वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकारी यांच्या बरोबर चर्चा करून दिवा विभागातील सरकारी जागा आपण पोलीस स्टेशन साठी मागणी करावी व तेथे तात्काळ दिव्यासाठी सुसज्ज असे पोलीस स्टेशन करावे अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.