“मी सभागृहात या सरकारला उघडं पाडणार आहे. प्रकाश महाजन हे प्रमोद महाजन यांचे भाऊ आहेत म्हणून लोक त्यांना थोडे आदर देत आहेत, त्यांनी विचार करावा की त्यांच्या पक्षातील ३२ वर्षांच्या नेत्याला महाराष्ट्रात किती ठिकाणी बोलावतात आणि आमच्या नेत्याला महाराष्ट्रातून किती ठिकाणी बोलावतात. या सरकारची दडपशाही येणाऱ्या निवडणुकीत ठाण्यातील जनता झुगारून देईल आणि जे दडपशाही करत आहेत त्यांना देखील झुगारून टाकेल.”, अशी टीका भास्कर जाधव यांनी ठाण्यात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातून येतात. या ठाणे जिल्ह्यातच ठाकरे गटाच्यावतीने शिवगर्जना हा मेळावा घेऊन आज ठाकरे गटातील नेत्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. ठाकेर गटाचे नेते राजन विचारे, भास्कर जाधव, अरविंद सावंत, केदार दिघे यांनी आपल्या भाषणांमधून शिंदे गाटवर चांगलेच आसूड ओढले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले होते प्रकाश महाजन?

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी आदित्य ठाकरेंवर टीका करत असताना म्हटले, “आदित्य ठाकरे प्रत्येक सभेत बोलत असताना ३२ वर्षाच्या नेत्याला घाबरले असे सांगतात. तू ३२ वर्षांचा झाला असल्यास तुझ्या आई-वडीलांना लग्न लावून द्यायला सांग. लग्न लावले नसल्यामुळे माणसाची गडबड होते. आमचं लग्न झाल्यामुळे आम्हाला घरचा धाक असतो. पण याला काहीच धाक नाही. ती दिशा गेली पटण्याला ती परत आलीच नाही. आदित्य ठाकरे प्रत्येक सभेत ३२ वर्षांचा झालो सांगतायत, त्यामुळे त्याच्या आई-वडीलांनी त्याच्याकडं लक्ष द्यावं”, अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली होती.

हे वाचा >> भास्कर जाधव यांची एकनाथ शिंदेंवर टीका; म्हणाले, “मुलं गेल्यावर दिघेंनी दुःखातून बाहेर काढलं आणि तुम्ही बाळासाहेबांच्या मुलाला…”

गद्दारांना क्षमा नाही

ठाण्याचे खासदार आणि एकेकाळचे एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे राजन विचारे यांनी देखील शिंदे गटावर जोरदार टीका केली. एकेकाळी आनंद दिघे यांच्यासोबत शिंदेंच्या खांद्याला खांदा लावून राजन विचारे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे काम केले होते. दिघे यांच्या गद्दारांना क्षमा नाही, या डायलॉगची आठवण करुन देताना विचारे यांनी टीका केली. ते म्हणाले, “ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची स्थापना होऊन ५७ वर्ष झाली. १९६७ साली शिवसेनेची पहिली सत्ता कुठे आली असेल तर ती याच ठाण्यात आली. आजवर ठाण्यातील असंख्य नेत्यांनी शिवसेनेला साथ दिली. यावेळी शिवसेनेच्या पहिल्या महापौरांपासून आतापर्यंतच्या अनेक नेत्यांची नावे राजन विचारे यांनी आपल्या भाषणात घेतली. अनेक नेत्यांनी जीवाचं रान करुन ही संघटना उभी केली. पण काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थाकरीता संघटना विकायला काढली. पण मी ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिकांचे आभार मानतो की सर्वांनी शिवसेनेला भक्कम साथ दिली.”

हे वाचा >> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ चुकीवर अजित पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, “खरं बोलायला गेलं की माझ्यावरच चिडतात, अरे…”

आनंद आश्रमात स्वार्थाचा बाजार मांडला यांची खंत

“येत्या काळात महापालिकेची निवडणुक असो, विधानसभा असो, खासदारकी असो,या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला भगवा डौलाने फडकेल. ज्या गुरुवर्य आनंद दिघे यांनी २४ तास ३६५ दिवस लोकांचा विचार केला. ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत भगव्याचाच विचार केला. बाळासाहेबांचा विचार केला त्यांचे आनंद आश्रम देखील या लोकांनी सोडलं नाही. याचा खेद वाटतो. आज आनंद आश्रमामध्ये स्वत: च्या स्वार्थासाठी या लोकांनी बाजार मांडला आहे.”, अशी खंत केदार दिघे यांनी व्यक्त केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group leader bhaskar jadhav rajan vichare arvind sawant slams eknath shinde in thane kvg