ठाणे : दिव्यातील भीषण पाणीटंचाईची समस्या असतानाही नागरिकांना भरमसाठ पाणी देयके देण्यात येत असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रभाग समितीवर शुक्रवारी मोर्चा काढला होता. पाणीटंचाई समस्या दूर करण्याची मागणी करत याबाबत एक महिन्यात उपाययोजना केली नाही तर ठाणे महापालिका मुख्यालयावर शिवसैनिक धडकतील, असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलाही सहभागी झाल्या होत्या. मोर्चेकरांनी पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. दिव्यातील पाणी टंचाईबाबत महिलांनी प्रशासनाला जाब विचारला. पाणी चोर आणि टँकर माफियांना पाणी मिळते. पण, दिव्यातील जनतेला पाणी का मिळत नाही असा प्रश्न ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. दिव्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले. तर, एक महिन्यात उपाययोजना केली नाही तर ठाणे महापालिका मुख्यालयावर शिवसैनिक धडकतील, असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा – डोंबिवलीत सराफाचे दुकान फोडून ७५ लाखाच्या ऐवजाची चोरी
ठाणे महापालिकेत मागील काही वर्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. शिवसेना फुटीनंतर दिव्यातील बहुतांश नगरसेवक हे शिंदे गटात गेले. दिव्यात याच लोकांचे वर्चस्व असतानाही येथील जनतेला न्याय मिळाला नाही. दिवा शीळ जलवाहिनीला माजी आमदार सुभाष भोईर यांनी मंजुरी मिळविली. २०२० मध्ये कामाचा कार्यादेश निघाला. पण, खासदार श्रीकांत शिंदे यांना श्रेय हवे असल्याने त्यांनी तीन वर्षे दिवेकारांना पाण्यापासून वंचित ठेवले, असा आरोप दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी यावेळी केला. तर दिव्यातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पाणी चोरांवर कारवाई करा अशी मागणी शहर प्रमुख सचिन पाटील यांनी केली. दिवा शहरातील पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका हा महिलांना बसत असून विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने घरचे आर्थिक गणित कोलमडते. परिणामी शहरातील पाणी समस्या निकालात काढावी अशी मागणी ज्योती पाटील यांनी केली.