वागळे इस्टेट येथील किसनगर येथे ठाकरे आणि शिंदे गटाच्या धुमश्चक्रीमध्ये ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर ठाण्याचे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आक्रमक झाले आहेत. या हल्ल्याला घाबरणार नाही… चोख उत्तर देऊ.. अशा इशारा विचारे यांनी शिंदे गटाला एका चित्रफितीतून दिला आहे. ‘आमचा प्राण गेला तरी बेहत्तर, पण ठाण्यातील शिवसेनेची शान जाणार नाही…सत्तेपुढे झुकणे हे आमच्या बाळासाहेबांची आणि धर्मविरांची शिकवण नाही.’ अशी टिकाही त्यांनी या चित्रफितीद्वारे केली आहे. मुख्यमंत्ऱ्याच्या चिथावणीमुळे हा हल्ला झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटामधील वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा >>>लोकल उशीरा आली हे ठरले निमित्त, टिटवाळा इथे झालेल्या ‘रेल रोको’ चे मुख्य कारण आहे ८.३३ ची वातानुकूलित लोकल
ठाणे येथील किसनगरमधील भटवाडी परिसरातील संजय घाडीगांवकर यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला असून त्यांची उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भटवाडी परिसरात त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह कार्यकर्ते त्याठिकाणी आले होते. त्याचवेळेस प्रभागातील शिंदे गटाचे माजी नगरसेवक योगेश जानकर हे दोन कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे करून आपल्या कार्यकर्त्यांसोबत कार्यालयात जात होते. यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. या घटनेत शिंदे गटाने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या दोन्ही गटांमध्ये वादाचे प्रसंग घडले. श्रीनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात शिंदे गटाने मोठी गर्दी केल्याने ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यातून बाहेर पडणे शक्य होत नव्हते. या भागात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. अखेर चार ते पाच तासानंतर पोलिसांनी या सर्वांना पोलिस संरक्षणात बाहेर काढले. त्याचदरम्यान, शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने खासदार विचारे यांच्या दिशेने पाण्याची बाटली भिरकावत कार्यकर्त्यांना मारहाण करत पोलिसांवर चालून जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी शिंदे गटावर लाठीहल्ला करण्यात आला होता.
हेही वाचा >>>कोपरी पूलावरील वाहतूक शनिवार ते सोमवार मध्यरात्री पूर्णपणे बंद; वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता
शिंदे गटाने ठाकरे गटावर केलेल्या या हल्ल्यानंतर ठाकरे गटाकडून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. समाजमाध्यमांवर ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. या हल्ल्यानंतर राजन विचारे यांनी ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ आशयाची एक चित्रफीत तयार करुन ती समाजमाध्यमावर प्रसारित केली आहे.
‘राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी भक्कम उभा आहे, या कट्टर शिवसैनिकांनी मिंधे गटाच्या पायाखालची वाळू सरकवली आहे. हे सत्य मिंधे गटाच्या पचणी पडत नाही. त्यामुळे मुख्यमंत्ऱ्यांच्या चिथावणीवरून मिंधे गटाच्या गुंडांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर भ्याड हल्ला केला असा आरोप या चित्रफितीत करण्यात आला आहे.
‘असे लाखो वार झेलत शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली आहे, आमचा प्राण गेला तरी बेहत्तर पण ठाण्यातील शिवसेनेची शान जाणार नाही. सत्तेपुढे झुकणे हे आमच्या बाळासाहेबांची आणि धर्मविरांची शिकवण नाही. अशी टिकाही त्यांनी चित्रफितीत केली आहे. तसेच या हल्ल्याला ठाण्यातील कट्टर शिवसैनिकांकडून चोख उत्तर दिले जाईल, ठाण्यावर अखेर पर्यंत शिवसेनेचा भगवाच राहील. असा इशाराही त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.