ठाणे : भाजप, मनसे, शिंदेच्या शिवसेनेपाठोपाठ शिवसेना (ठाकरे गट) ने पहिली उमेदवारी जाहीर केली असून यामध्ये कोपरी- पाचपखाडी मतदार संघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव करत ठाणेदार असल्याचे दाखवून दिले होते. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याची रणनीती ठाकरे गटाकडून आखली जात होती. त्यामुळे हा तुल्यबळ उमेदवार कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) ने पहिली उमेदवारी जाहीर करत यामध्ये कोपरी- पाचपखाडी मतदार संघातुन आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी- पाचपखाडी मतदार संघातुन तीनदा निवडून आले असून ते यंदाही याच मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे या मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे असा सामना रंगणार आहे. याशिवाय, ओवळा माजीवडामधून नरेश मणेरा, ठाणे शहरमधून राजन विचारे, ऐरोलीमधून एम .के .मडवी, भिवंडी ग्रामीणमधून महादेव घाटळ, कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर, अंबरनाथमधून राजेश वानखेडे, डोंबिवलीमधून दीपेश म्हात्रे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे.