ठाणे : श्रीनगर पोलिस ठाण्याच्या आवारात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर सोमवारी रात्री झालेल्या पोलिसांकडून झालेल्या लाठीहल्ल्याची चौकशी करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या लाठीहल्ल्यात कित्येक जणांची डोकी फुटण्याबरोबरच मुका मार लागला असून पोलीसांच्या कृतीतून कोणा एका गटाची बाजू घेवून लाठीहल्ला केला असल्याचे दिसून येते. या पोलिसांसमवेत काही पोलीस नसलेली माणसे सुद्धा पोलीस म्हणून जमावावर लाठीहल्ला करीत होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. तसेच जमावाला आम्ही स्वत: समजविले, नाहीतर प्रचंड मोठ्या प्रमाणात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती, असा दावाही त्यांनी केला आहे.
श्रीनगर पोलिस ठाण्याच्या आवारात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर सोमवारी रात्री पोलिसांकडून झालेल्या लाठीहल्ल्यासंदर्भात बाळासाहेबांची शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिले आहे. त्यात त्यांनी भटवाडी आणि श्रीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात खासदार राजन विचारे यांच्यासोबत बाहेरुन आलेल्या समर्थकांनी आमच्या पक्षाचे माजी नगरसेवक योगेश जानकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत विभागात असलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बाचाबाची, शिविगाळ तसेच त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करुन मारहाण केल्याचे म्हस्के यांनी पत्रात म्हटले आहे.
खासदार राजन विचारे, संजय घाडीगांवकर यांच्यासोबत बाहेरुन आलेल्या समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली, अश्लील भाषेचा वापर करुन घोषणा दिल्या. त्याचा जाब विचारण्याकरिता विभागातील हजारो नागरिक श्रीनगर पोलीस ठाण्यात गेले. यावेळी खासदार राजन विचारे यांच्यासोबत त्यांचे विभागाच्या बाहेरील ४० ते ५० समर्थक बसलेले होते. त्याचवेळी त्यांच्यासोबत असलेल्या काही महिला आणि पुरूषांनी सोशल मिडीयावर मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधात अश्लील भाषेत पोस्ट टाकल्या. यामुळे याबाबत तक्रार दाखल करण्याकरिता आलेल्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होण्याबरोबरच जमाव आक्रमक होऊ लागला.
त्यात खासदार विचारे यांच्यासोबत आलेले समर्थक नागरिकांच्या दिशेने चुकीच्या पध्दतीने हातवारे करुन जमावाला उचकावण्याचा प्रयत्न करीत होते. ही बाब उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या आम्ही निदर्शनास आणून दिली. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी राजन विचारे यांच्या समर्थकांना समज दिली. तरीसुद्धा त्यांच्याकडून वारंवार हे कृत्य होत होते, त्यामुळे जमाव अधिकच संतापला आणि त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली, असेही ते म्हटले आहे. ज्यावेळी खासदार विचारे आणि त्यांचे समर्थक पोलीस ठाण्यामधून बाहेर जाताना जमावाने घोषणाबाजी केली. त्यांच्या समर्थकांनी जमावाला उचकावण्याचे प्रयत्न हेच त्यामागे कारण होते. त्याक्षणी श्रीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीसांनी लाठ्यांनी तसेच लाकडी बॅटने लोकांना मारण्यास सुरूवात केली.
पोलीसांना आम्ही अडवत असताना सुद्धा पोलीस काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांचा लाठीहल्ला सुरूच होता. यात कित्येक जणांची डोकी फुटली असून मुका मार लागलेला आहे. पोलीसांच्या कृतीतून कोणा एका गटाची बाजू घेवून लाठीहल्ला केला असल्याचे दिसून येते. या पोलीसांसमवेत काही पोलीस नसलेली माणसे सुद्धा पोलीस म्हणून जमावावर लाठीहल्ला करीत होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. जमावाला आम्ही स्वत: समजविले, नाहीतर प्रचंड मोठ्या प्रमाणात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती, असा दावा करत लाठीहल्ल्याची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.