ठाणे : वागळे इस्टेट येथील श्रीनगर भागात झालेल्या हल्ल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आणखी एक चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित करून शिंदे गटाला इशारा दिला आहे. गुंडांकडून आमच्यावर हल्ले करता, हेच तुमचे हिंदुत्त्व का? असा प्रश्न ठाकरे गटाने चित्रफितीच्या माध्यमातून शिंदे गटाला विचारला आहे. तसेच अंगावर यायचे तर अंगावर या..हा संघर्ष थांबणार नाहीच. जोवर हा शिवसैनिक पुन्हा एकदा ठाण्यावर हक्काने भगवा फडकवत नाही तोवर..असा इशाराही त्यांनी या चित्रफितीच्या माध्यमातून शिंदे गटाला दिला आहे.
हेही वाचा >>> भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानामुळे ठाकरे गटाचे ठाण्यात आंदोलन
श्रीनगर येथील भटवाडी परिसरात शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण झाली होती. या घटनेनंतर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह ठाकरे गटातील पदाधिकारी याप्रकरणी तक्रार देण्यासाठी श्रीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. यामध्ये महिला पदाधिकारीही होत्या. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारातही शिंदे गटाचे शेकडो कार्यकर्ते जमले होते. या जमावामुळे खासदार राजन विचारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षणात बाहेर काढण्याची वेळ आली होती. त्यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करत पोलीस ठाण्याबाहेरील जमाव पांगवला. यावेळी शिंदे गटाच्या जमावाने महिला पदाधिकाऱ्यांवरही हल्ल्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप ठाकरे गटाने केला होता.
या घटनेनंतर ठाण्यात ठाकरे आणि शिंदे गटाक़डून दावे-प्रतीदावे करत आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. सुमारे आठवड्याभरापूर्वी ठाकरे गटाने एक चित्रफीत प्रसारित करत शिंदे गटावर गंभीर आरोप केले होते. त्यापाठोपाठ मंगळवारीही ठाकरे गटाने आणखी एक चित्रफित प्रसारित केली आहे. यामध्ये महिलांना मारहाण करण्यासाठी धावून जाणारे बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे शिवसैनिक असूच शकत नाही. गुंडांकडून आमच्यावर हल्ले घडविता, हेच तुमचे हिंदुत्त्व का ? तडीपार गुंड सिद्धू अभंगे याने निष्ठावंत शिवसैनिकांवर हल्ला केला. त्यामुळे सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्याची ओळख गुंडागर्दी खपवून घेणारे ठाणे अशी व्हायला वेळ लागणार नाही. आमच्या संयमाला भ्याडपणा समजू नका, आम्ही लढणार कायद्याने, लोकशाहीने आणि जनतेच्या साथीने. तडीपार करा, खोट्या केसेस टाका, चौकशी लावा, गटबाजी करा किंवा अंगावर यायचे तर अंगावर या..हा संघर्ष थांबणार नाहीच.. जोवर हा शिवसैनिक पुन्हा एकदा ठाण्यावर हक्काने भगवा फडकवत नाही तोवर., असा इशारा ठाकरे गटाने शिंदे गटाला चित्रफितीद्वारे दिला आहे.