ठाणे : कोलशेत येथील मनोरमानगर भागात मंगळवारी ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. येथील वाचनालयावरील फलक उभारण्यावरून हा वाद झाला. या वादामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलीस दाखल झाल्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यात आले. तसेच वाचनालयाला पोलिसांनी टाळे ठोकले. मनोरमानगर येथील बसथांब्याजवळ एक वाचनालय आहे. या वाचनालयावर पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील मुख्य पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र असलेले फलक होते. परंतु शिवसेनेमध्ये फूट निर्माण झाल्याने या वाचनालयावर दोन्ही गटांकडून दावे केले जात होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> रामदास कदम बेईमान; खासदार राजन विचारे यांची टीका

हेही वाचा >>> अंबरनाथच्या पोलीस वसाहतींची कोंडी फुटणार ; पोलीस वसाहतींना निधी देण्याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक

सोमवारी मध्यरात्री शिंदे गटातील काहीजणांनी या वाचनालयावरील फलक बदलला. त्यामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट वाचनालयाचा ताबा घेतला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर कापूरबावडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाचनालयातील महिलांना बाहेर काढून वाचनालयाला टाळे ठोकले. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे देखील याठिकाणी दाखल झाले. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणबाजी केली. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. ठाकरे गटाचे समर्थक निघून गेल्यानंतर शिंदे गटाच्या समर्थकांनी पुन्हा शिंदे गटाचा फलक याठिकाणी उभारला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray shinde group activists police to the activists ysh