डोंबिवली: डोंबिवलीतील ठाकुर्ली पुलाचा पूर्वेकडचा भाग ते पश्चिमेकडील रेल्वे मैदान ते गणेशनगर आणि भावे सभागृह रस्त्याच्या दोन्ही बाजुचे पथदिवे मागील काही दिवसांपासून बंद आहेत. पादचाऱ्यांना अंधारातून वाट काढत जावे लागते. वाहनांचे पुढील बाजुचे दिवे बंद असतील तर अपघात होण्याची शक्यता या रस्त्यावर आहे. पालिकेच्या विद्युत विभागाने तातडीने या रस्त्यांवरील पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवलीतील अनेक रहिवासी सकाळ, संध्याकाळ डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर भागातील रेल्वे मैदान, ठाकुर्ली खाडी किनारा भागात फिरण्यासाठी येतात. अनेक नागरिक पहाटे चार वाजल्यापासून या भागात फिरण्यासाठी येतात. या भागातील पथदिवे बंद असल्याने त्यांना मोबाईलच्या विजेरीच्या झोतात चालावे लागते. या अंधाराचा फायदा घेऊन अनेक भुरटे चोर या भागात फिरत असतात.

हेही वाचा… बँक खात्यातून १६ हजार कोटी रुपयांची उलाढाल; नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

ठाकुर्ली पूल ते गणेशनगर, भावे सभागृहाजवळील महात्मा गांधी रस्ता सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यांवरुन पादचारी, वाहनांची सतत वर्दळ असते. या वर्दळीच्या रस्त्यावरील पथदिवे मागील महिन्यापासून तांत्रिक बिघाडामुळे लुकलुकत होते. पूर्ण प्रकाश ते देत नव्हते. त्यामुळे ते आता बंद पडले असावेत, असे या भागात नियमित फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सांगितले. वीज बचतीसाठी पालिकेने सुमारे ३३ हजार एलईडी पथदिवे शहराच्या सर्व रस्त्यांवरील बसविले आहेत.

हेही वाचा… टोल प्रश्नी मनसे पाठोपाठ अजित पवार गटाची उडी; ठाणेकरांना टोलमुक्ती द्यावी, अजित पवार गटाची मागणी

आता पाऊस गेल्याने पालिकेच्या विद्युत विभागाने विशेष मोहीम राबवून शहराच्या विविध भागातील रस्त्यांवरील पथदिवे चालू की बंद आहेत याची तपासणी मोहीम हाती घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thakurli bridge in dombivali to ganesh nagar road is in darkness as the street lights are off dvr
Show comments