अनिल पाटणकर (वास्तुविशारद)

ठाण्याच्या क्षितिज रेषेवर आता आकाशाला गवसणी घालणाऱ्या टोलेजंग इमारती दिसू लागल्या आहेत. शहराचा हा नवा चेहरा अतिशय लोभसवाणा आहे. भविष्यातील ‘स्मार्ट सिटी’चे संकल्पचित्र तयार करताना बहुतेकदा हे नवे शहरच दाखविले जाते. मात्र या नव्या वसाहतींइतकेच किंबहुना त्यापेक्षा महत्त्वाच्या अशा जुन्या वस्त्याही ठाणे शहराच्या अविभाज्य भाग आहेत. विशेषत: पूर्वद्रूतगती महामार्गाच्या अलीकडे असलेल्या या वस्त्यांमधील बहुतेक इमारती किमान २० ते ५० वर्षांपूर्वीच्या आहेत. साहजिकच त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. दुर्दैवाने आपल्याकडे घरांची अंतर्गत देखभाल आणि सजावटीकडे जितके लक्ष दिले जाते, तेवढे बाह्य़ इमारतीकडे दिले जात नाही. परिणामी इमारती खंगतात. जर्जर होतात. जुन्या ठाण्यात सध्या नेमके तेच घडताना दिसत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शहरातील धोकादायक इमारतींचा आकडा वाढत आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका प्रशासन धोकादायक इमारतींची संख्या जाहीर करते. संबंधित इमारतींना नोटीस बजावते. दीड वर्षांपूर्वी नौपाडय़ात कृष्णनिवास इमारत कोसळल्यानंतर महापालिकेने अतिधोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतीतील रहिवाशांना हलविले. गेल्या पाच-सात वर्षांत इमारत धोकादायक ठरल्याने जुन्या ठाण्यातील हजारो कुटुंबे विस्थापित झाली आहेत. मालक-भाडेकरू वाद, अपुरा एफएसआय, जाचक अटी यामुळे जुन्या इमारतींचे पुनर्निर्माण मृगजळ ठरले आहे.

[jwplayer ZL8IBmbt]

नव्या टाऊनशिप आणि अनधिकृत इमारतींना सुविधा आणि सवलती देण्यात शासन जितकी तप्तरता दाखविते, तितकी जुन्या अधिकृत इमारतींच्या जीर्णोद्धाराबाबत दाखवीत नाही, असा तिथे राहणाऱ्या रहिवाशांचा आक्षेप आहे. त्यात काही अंशी तथ्यही आहे. मालक आणि भाडेकरू या वादात दोन्ही पक्षांचे एकमेकांवर अनेक आक्षेप आणि आरोप आहेत. त्यात कोणतीही एका पक्षाची बाजू घ्यावी अशी परिस्थिती नाही. एक मात्र खरे की बहुतेक मालकांना इमारत लवकरात लवकर पडावी असे वाटते. अर्थातच भाडेकरूंना याच्या नेमके उलट वाटत असते. पुनर्निर्माणाचे स्वप्न पाहण्यापेक्षा इमारतीची दुरुस्ती केली तर तिचे आयुष्य किमान दहा वर्षांनी वाढू शकते. गेल्या काही वर्षांत जुन्या ठाण्यातील काही जुन्या इमारतींच्या दुरुस्त्या माझ्या मार्गदर्शनाखाली केल्या गेल्या. ब्राह्मण सोसायटीतील शरद दर्शन हे त्याचे ठळक उदाहरण. ‘कृष्ण निवास’ कोसळल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने अनेक जुन्या इमारतींना धोकादायक ठरवून नोटिसा दिल्या. शरद दर्शन त्यापैकीच एक. मात्र सुदैवाने या इमारतीत भाडेकरू आणि मालक यांचा एकमेकांवर विश्वास होता. त्यामुळे ते एकत्र आले. परिणामी धोकादायक असलेल्या इमारतीची डागडुजी होऊन तिचे आयुष्य आता दहा वर्षांनी वाढले आहे. ‘शरद दर्शन’मधील भाडेकरू केवळ तेवढय़ावरच थांबले नाहीत. त्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली यशोगाथा इतर जुन्या इमारतीतील रहिवाशांना सांगितली. त्यातून आता काही इमारतीतील मालक आणि भाडेकरू इमारतीची दुरुस्ती करण्यास पुढे येत आहेत. मुंबईप्रमाणे ठाण्यात घरदुरुस्ती मंडळ असावे, अशी मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे. धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून वर्गीकरण करावे लागेल. त्यानंतर दुरुस्ती करण्याजोग्या इमारतींचा प्राधान्यक्रम ठरवून डागडुजी करावी. त्यामुळे इमारत पडून होणारे संभाव्य अपघात टळू शकतीलउमेदवारी अर्जासाठी ऑनलाइन अडथळा. शासनाकडे याबाबतीत तांत्रिक मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे शहरातील खासगी तज्ज्ञांची समिती नेमून त्याद्वारे अशी कामे करून घेणे श्रेयस्कर ठरेल.  अनेक इमारतींच्या जागेचे अद्याप मानीव हस्तांतरण (कन्व्हेअन्स डीड) झालेले नाही. त्याशिवाय पुनर्विकास अशक्य आहे. मुंबईत विकासासाठी अधिक चटईक्षेत्र मिळते. त्यामुळे तिथे मोठय़ा प्रमाणात पुनर्निर्माण सुरू आहे. ठाण्याची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी वेळोवेळी विविध मनोरंजनाचे महोत्सव आयोजित करीत असतात. त्याच्याच जोडीने जुन्या इमारतींचे दुरुस्ती अभियानही लोकप्रतिनिधींनी हाती घेतले तर धोकादायक इमारतींची समस्या आटोक्यात राहू शकेल. नाही का?

[jwplayer 5i2fQEnk]

 

Story img Loader