रिक्षातून पुढे सोडतो असे सांगून एका भामट्याने वृद्धाच्या खिशातील ९ हजार ५०० रुपये काढून घेतल्याचा प्रकार गुरूवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मुंबईतील कांजुरमार्ग येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीला गुडघेदुखीचा त्रास आहे. त्यामुळे ती औषधे घेण्यासाठी ते गुरूवारी सायंकाळी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात आले होते. औषधे घेतल्यानंतर ते त्यांच्या ठाण्यातील एका मित्राला गडकरी रंगायतन जवळ भेटण्यासाठी पायी जात होते. त्याचवेळी एक भामटा रिक्षा घेऊन त्याठिकाणाहून जात होता. त्याने त्या वृद्धाला आवाज देऊन रिक्षातून पुढे सोडतो असे सांगितले. वृद्ध विश्वास ठेवून त्या रिक्षात चालकाच्या मागील आसनावर बसले. त्यानंतर रिक्षा चालकाने वृद्धास त्याच्या बाजूस बसण्यास सांगितले. वृद्ध त्याच्या बाजूला बसले असता तंबाखू मागण्याच्या बाहाण्याने बोलण्यात गुंतवून त्या रिक्षा चालकाने वृद्धाच्या खिशातील ९ हजार ५०० रुपये काढून घेतले.
वृद्ध रिक्षातून उतरल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. फसवणूक झाल्याने त्यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.