आंतरराष्ट्रीय कुराश स्पर्धेमध्ये खेळण्यसाठी ४८ किलोखालील वजनी गटात डोंबिवली येथील पूर्वा मॅथ्यू तर ६० किलो वजनी गटात आशुतोष लोकरे यांनी प्रथम क्रमांक पटकावून आपले स्थान निश्चित केले आहे. भारतीय कुराश महासंघातर्फे ४ व ५ जून रोजी बाबा गंगनाथ क्रीडा संकुल दिल्ली येथे आशियाई कुराश स्पर्धेसाठी राष्ट्रीय निवड चाचणी आयोजित केली होती. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांतील खेळाडूंनी सहभाग दर्शवला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२० ते २४ जुलै रोजी चायनीज तायपे येथे आंतरराष्ट्रीय कुराश असोसिएशन व कुराश कॉन्फेडरेशन अॉफ आशिया आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय कुराश बीच स्पर्धेत भारताच्या २८ खेळाडूंमधून पूर्वा आणि आशुतोष यांची निवड झाली. चायनीज तायपे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बिच कुराश स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षिका म्हणून डोंबिवली येथील व्हिक्ट्री ज्युदो क्लबच्या लीना मॅथ्यु ओक यांची निवड झाली आहे. कुराश हा क्रीडा प्रकार मुळचा उझबेकिस्तानचा असून साधारण ३ हजार वर्षांपासून तो खेळला जातो. या खेळात ज्युडोप्रमाणेच प्रतिस्पर्धकाचा तोल विविध पद्धतीने घालवून त्याला नमवले जाते.

राज क्रिकेट अकादमीला जेतेपद

श्रीलंकेमध्ये केलानिया क्रिकेट क्लबने आयोजित केलेल्या १६ वर्षांखालील आमंत्रित ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद ठाण्यातील राज अकादमीने पटकावले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत राज अकादमीने आनंद क्रिकेट क्लबवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला.

आनंद क्लबने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हसन (४२) आणि मुस्तफा (३१) यांच्या फलंदाजीच्या जोरावर आनंद क्लबने १९ षटकांमध्ये सर्व फलंदाज गमावत १०५ धावा केल्या. राज अकादमीकडून कुशल चौधरीने तीन आणि तनीष शेट्टीने दोन बळी मिळवले. या आव्हानाचा पाठलाग करताना राज अकादमीने पाच फलंदाज गमावत १६ षटकांमध्ये १०६ धावा केल्या. राज अकादमीकडून रोहन मोरेने नाबाद ४५ धावांची खेळी साकारत विजयात मोलाचा वाटा उचलला, तर हर्ष पवारने २५ धावा केल्या. रोहनलाच यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या वेळी सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार कौशल चौधरी आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार प्रतीक लालेने पटकावला.

संक्षिप्त धावफलक : आनंद क्रिकेट क्लब : २० षटकांत सर्व बाद १०५ (हसन ४२, मुस्तफा ३१; कौशल चौधरी ३/२५, तनीष शेट्टी २/२८) पराभूत वि. राज क्रिकेट अकादमी : १६ षटकांत ५ बाद १०६ (रोहन मोरे नाबाद ४५, हर्ष पवार २५; हिपुका ३/२८, रोशन २/३२). सामनावीर : रोहन मोरे.

ठाण्यातील पाच खेळांडूंची राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्ससाठी निवड

हैद्राबाद येथे गच्चीबावली स्टेडियम येथे २८ जून ते २ जुलै रोजी होणाऱ्या अ‍ॅथेलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यातून २७ पुरुष खेळाडू तर २० महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यात ठाणे जिल्ह्य़ातील पाचजणांचा समावेश आहे. ४०० मीटर धावणे या स्पर्धेत पुरुष गटात दिपू नानू तर १०० मीटर आणि २०० मीटर धावणे यासाठी गौरांग आंब्रेची निवड झाली आहे. महिला गटात १०० मीटर धावणे आणि लांब उडी यासाठी श्रध्दा घुले आणि २०० मीटर धावणे यासाठी अक्षय्या अय्यर तर ४०० मीटर अडथळा शर्यतीत संजना लहानगे यांनी बाजी मारली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सिंघानिया शाळेची बाजी

मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि सिंघानिया ट्रॉफी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत सिंघानिया शाळेने बाजी मारली आहे. सिंघानिया शाळेच्या दिशान राणे यास क्रिकेटर ऑफ दी इयर हा किताब देण्यात आला आहे.   यावेळी सिंघानिया शाळेने ११८ धावा कोढून वसंत विहार शाळेच्या संघावर मात केली. उत्कृष्ट फलंदाज म्हणून डीएव्ही शाळेच्या वेदांत सिंग याला गौरविण्यात आले तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओमकार नंदीवाडेकर याला सन्मानित करण्यात आले.  लोकपुरम शाळेच्या ओमकार सावर्डेकर याला उत्तम क्षेत्ररक्षक तर मॅन ऑफ दी सीरिज ओमकेश कामत याला देण्यात आले.