ठाणे : देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने रविवारी ठाण्यात राहणाऱ्या ग्रिहीथा विचारे या १० वर्षाच्या चिमुकलीने उत्तराखंडाच्या केदारकंठा (३८०० मीटर) उंच शिखरावर प्रतिकात्मक राष्ट्रध्वज फडकविला. तिने उणे १० अंश ते उणे ४ अंश सेल्सियस तापमान असतानाही शिखरावर यशस्वीरित्या चढाई केली. यापूर्वी ग्रिविथाने अनेक शिखरांवर यशस्वीरित्या चढाई केली आहे. देशातील सर्वात लहान गिर्यारोहकांपैकी एक म्हणूनही तिला ओळखले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्रिहीथा ही वयाच्या साडेसहाव्या वर्षापासून गिर्यारोहण करते. तिला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. नऊ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एक एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तिच्याकडे आहेत. तिने यापूर्वी सह्याद्रीतील अनेक कठीण ट्रेक, किल्ले आणि सुळके सर केले आहेत. तिच्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये आठ वर्षांच्या वयात एव्हरेस्ट बेस कॅम्प- नेपाल, नवव्या वर्षात माउंट किलिमांजारो- टांझानिया, मलेशियातील माउंट किनाबलु आणि वयाच्या १० व्या वर्षी माऊंट बाजारदुझू- रशिया/अझरबैजान शिखरे सर केली आहेत. ग्रिहीथाचा केदारकंठा शिखर चढण्यासाठीचा प्रवास २२ जानेवारीपासून मुंबईतून सुरू झाला. केदारकंठामध्ये तापमान उणे असतानाही तिने हा शिखर यशस्वीरित्या सर केला. त्यानंतर तिने तेथे जाऊन भारताचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज फडकविला. तिचा दृढनिश्चय आणि लवचिकता सार्थ ठरली. या उल्लेखनीय कामगिरीने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. प्रजासत्ताक दिनी केदारकांठा शिखरावर चढाई करणारी आणि भारताचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज फडकविणारी ती सर्वात पहिली लहान मुलगी आहे असे तिच्या पालकांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane 10 year old girl grihitha vichare hoisted national flag at uttarakhand s kedarkantha css