ठाणे : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे कामानिमित्तने जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत असताना सोमवारी रात्री मुंब्रा येथील रेतीबंदर भागातील रेल्वे पूलावरून जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाडीतून खाली पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार गर्दीमुळे झाला की इतर कारणामुळे याबाबत स्पष्टता आलेली नाही. असे असले तरी २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रवासी गर्दीचे बळी ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. रेल्वेचे अनेक प्रकल्प विविध कारणांमुळे रखडले आहेत. या रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांमुळे प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याची टीका प्रवासी संघटनेकडून केली जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील कसारा, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा आणि कळवा भागात मोठ्याप्रमाणात नागरीकरण वाढले आहे. येथे राहणारे हजारो नोकरदार ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईत कामानिमित्ताने येत असतात. रेल्वेला समांतर रस्ता नसल्याने लाखो नागरिकांना रेल्वे वाहतुकीशिवाय मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जाण्यासाठी पर्याय नाही. दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत प्रवाशांची गर्दी वाढत आहे. २०२२ मध्ये रेल्वे प्रशासनाने ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण केले. एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना पाचवी आणि सहावी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्यात आल्याने रेतीबंदर भागातून उपनगरीय रेल्वेगाड्यांची प्रवाशांना दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु अनेक एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांची वाहतूक रेतीबंदर येथूनच होत असल्याचा दावा प्रवासी करत आहेत.
हेही वाचा – कल्याण, डोंबिवलीत उमेदवारांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे राजकीय वाहन कोंडी, प्रवासी हैराण
एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीमुळे उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत असून दररोज सकाळी आणि रात्री प्रवाशांना गर्दीचा फटका सहन करावा लागत आहे. रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी वाढून रेल्वेतून पडून प्रवाशांचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांत मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकादरम्यान ३१ जणांचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. तर, १३ जण जखमी झाले आहेत. तर याच वर्षात रेल्वेच्या धडेकत ३५ जणांचा मृत्यू झाला होता. सोमवारी रात्री एका प्रवाशाचा मुंब्रा रेतीबंदर भागात रेल्वेपुलावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पासाठी हा पूल उभारण्यात आला होता. अपघात नेमका कसा झाला याबाबबत स्पष्टता नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हेही वाचा – शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
ठाणेपल्ल्याडील कळवा-मुंब्रा येथील रेल्वे प्रवास जीवघेणा आहे. राज्य सरकार आणि जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन मुंबईकरांसाठी बांधलेल्या नव्या लोहमार्गावर रेल्वे अधिकारी लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांची वाहतूक करत आहेत. दुसरीकडे अनधिकृत मतदारांसाठी कळवा-ऐरोली उन्नत मार्गिकेसारखा महत्त्वाचा प्रकल्पही रखडलेला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांचे जीव जात आहेत. – सिद्धेश देसाई, सरचिटणीस, मुंबई रेल्वे प्रवासी संघ.