ठाणे – शाळेत देण्यात येणाऱ्या अन्न पदार्थातून विद्यार्थ्यांना पोटदुखी आणि उलटीचा त्रास होऊ लागल्याचा प्रकार कळवा येथील सहकार विद्या प्रसारकर मंडळ शाळेमध्ये मंगळवारी उघडकीस आला आहे. या शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

कळवा येथील सहकार विद्या प्रसारकर मंडळ शाळेत मंगळवारी दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे मधल्या सुट्टीत शाळेतून भात, डाळ आणि मटकीची उसळ देण्यात आली होती. हे जेवण झाल्यानंतर ५ ते ६ विद्यार्थ्यांना उलट्या सुरु झाल्या. तर, काहींच्या पोटात दुखू लागले. एकावेळी येवढ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्यामुळे शाळा प्रशासनाने कळवा रुग्णालयात संपर्क साधला आणि रुग्णवाहिका बोलावून घेतली. एकूण ३८ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या घराच्यांना सायंकाळी उशिरा माहिती दिली. माहिती मिळताच, विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयात धाव घेतली.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबरला ठाण्यात, घोडबंदर मार्गावर वाहतुकीत मोठे बदल

डॉक्टरांनी त्या विद्यार्थ्यांना तपासले असता, त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने शाळेकडे चौकशी केली. त्यावेळी जेवणात देण्यात आलेली मटकी ही गेले दोन ते तीन दिवसांपासून भिजत ठेवल्याची माहिती समोर आली. या मटकीच्या भाजीचा विद्यार्थ्यांना त्रास झाला असावा असा अंदाज रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे. हे सर्व विद्यार्थी ८ ते ११ वयोगटातील असून या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

हेही वाचा – शिवरायांच्या पुतळ्याबाबत बदलापुरात मालवणची पुनरावृत्ती ?

या पूर्वी देखील येथे देण्यात येणाऱ्या अन्नात झुरळ, किडे आढळून आले असल्याचा दावा माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी केला आहे. तसेच पालकांना देखील ही माहिती दिली असल्याचे ते म्हणाले. त्यातही शालेय पोषण आहार हे आधी शाळेच्या मुख्याध्यपकांनी खाणे अपेक्षित असताना त्यांनी तसे न करता थेट विद्यार्थ्यांना दिल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.