ठाणे : करोना काळात उभारण्यात आलेल्या पार्किंग प्लाझा रुग्णालयातील प्राणवायु निर्मीती प्रकल्प आणि प्राणवायु साठवणूक टाक्या गेल्या दोन वर्षांपासून धुळखात पडल्या आहेत. या मुद्द्यावरून टिका होऊ लागल्यानंतर पालिका प्रशासनाने आता प्राणवायु प्रकल्प आणि प्राणवायु साठवणूक टाक्या कळवा रुग्णालयाच्या आवारात स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला असून या कामासाठी पालिकेने निविदा काढली आहे.
करोना काळात रुग्ण संख्येत मोठी वाढ होऊ लागली होती. रुग्ण उपचारासाठी शासकीय तसेच खासगी रुग्णालये अपुरी पडू लागली होती. यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने शहरात साकेत येथे ग्लोबल करोना रुग्णालय उभारले होते. परंतु हे रुग्णालय सुद्धा रुग्ण उपचारासाठी अपुरे पडू लागल्यानंतर पालिकेने माजिवडा येथील पार्किंग प्लाझा इमारतीत रुग्णालय उभारले होते. याठिकाणी पालिकेने रुग्ण उपचार सुविधाही सुरू केली होती. याठिकाणी प्राणवायु साठवणुकीसाठी टाक्या उभारण्यात आल्या होत्या. मात्र, प्राणवायूचा पुरवठा कमी झाल्याने तसेच तो उपलब्ध होत नसल्यामुले येथील रुग्णांना ग्लोबल रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेव्हापासून पार्किंग प्लाझा रुग्णालय प्राणवायू पुरवठय़ाअभावी बंदावस्थेत आहे. यानंतर या रुग्णालयाजवळ ठाणे महापालिकेतर्फे प्राणवायू निर्मिती आणि पुरवठा प्रकल्प उभारण्यात आला होता.
करोना काळानंतर हे रुग्णालय बंद करण्यात आले. तेथील साहित्य कळवा रुग्णालय येथे हलविण्यात येईल असा निर्णय २०२३ मध्ये झाला होता. परंतु दोन वर्षे उलटूनही येथील साहित्य काही हलविण्यात आले नव्हते. आता ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने येथील साहित्य हलविण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
ठाणे महापालिकेने करोना काळात पार्किंग प्लाझा येथे ३ प्राणवायु साठवणुकीच्या टाक्या बसविण्यात आल्या होत्या. त्यातील दोन १३ किलो लीटर आणि एक १० किलो लीटर क्षमतेची टाकी होती. याशिवाय, प्राणवायु निर्मितीचे तीन प्रकल्प उभारण्यात आले होते. रुग्णालय बंद झाल्यामुळे प्राणवायु निर्मीती प्रकल्प आणि प्राणवायु साठवणूक टाक्या गेल्या दोन वर्षांपासून धुळखात पडल्या आहेत. ते आता कळवा रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येणार असून या कामासाठी पालिकेने निविदा काढल्या आहेत. या कामासाठी ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तसेच याठिकाणी असलेल्या खाटा, चादरी, टेबल तसेच इतर साहित्या हे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांसाठी देण्यात येणार आहे. त्या संदर्भात तेथील रुग्णालयांशी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली.