आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने विविध विभागांच्या करासह पाणी देयकांच्या वसुलीसाठी गेले वर्षभर राबविलेल्या विशेष मोहिमेत ८ हजार ५७१ थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडीत केल्या आहेत. थकबाकीदारांविरोधात कठोर भुमिका घेण्याबरोबरच पाणी देयकांच्या वसुलीत वाढ करण्यात पालिका प्रशासनाला यश आले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षात पाणी देयंकाच्या वसुलीत १४ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
हेही वाचा >>>ठाणे: पाणीपुरी खाण्यास पैसे दिले नाही म्हणून जीवेठार मारण्याचा प्रयत्न
करोना काळापासून ठाणे महापालिकेच्या जमा-खर्चाचे गणित बिघडले आहे. आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या महापालिका प्रशासनाने विविध विभागांच्या करासह पाणी देयकांच्या वसुलीवर गेले वर्षभर भर दिला. ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्या पथकाने वर्षभर विशेष मोहिमा राबविल्या. त्यात देयकांचा भारणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात कठोर भुमिका घेऊन त्यांच्या नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई केली. वर्षभरात ८ हजार ५७१ नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या. त्यापैकी वागळे इस्टेट भागात सर्वाधिक म्हणजेच २ हजार ८२० नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल कळवा भागात १ हजार ७२३, दिवा भागात १ हजार ३०३, मुंब्रा भागात १ हजार १४५ नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच पालिकेने नियमित पाणी देयंकाच्या वसुलीवरही भर दिला होता. गेल्या वर्षभरात १३४ कोटी ४६ लाख ४३ हजार ७८४ रुपयांच्या पाणी देयकाची वसुली पालिका प्रशासनाने केली आहे. त्याआधीच्या वर्षात १२० कोटी ५ लाख ३२ हजार ८९६ रुपयांच्या पाणी देयकांची वसुली झाली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षात पाणी देयंकाच्या वसुलीत १४ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
पाणी वसुली आकडेवारी प्रकार वसुली रक्कम
जलमापक नसलेल्या नळजोडण्या ५८,१४,६६,०४४
जलमापक नळ जोडण्या ६७,०६,४०,३१४
मुख्यलयात जमा झालेले पाणी देयके १३४,४६,४३,७८४