ठाणे : येथील विवियाना मॉलजवळ मुंबई-नाशिक महामार्गावर रविवारी सकाळी ०६:२७ वाजताच्या सुमारास एक अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ संथ गतीने सुरू होती. विशाल मिश्रा हे आपल्या वाहनाने मुलुंडहून मुंबई नाशिक महामार्गावरुन कसारा येथे प्रवास करत होते.
दरम्यान, त्यांचे वाहन विवियाना मॉलजवळ येताच मागून येणार्या एका अज्ञात डंपर चालकाची धडक विशाल यांच्या वाहनाला बसली. या धडकेमुळे त्यांचे वाहन रस्त्याच्या दुभाजकावर आदळले. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनात वाहनचालकासह चार प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.
सर्वजण सुखरूप असल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. परंतू, या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ संथ गतीने सुरू होती. रस्त्यावर पडलेले दुभाजकाचे रॅबिट आपत्ती व्यवस्थापन आणि घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला केले. तसेच पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या मदतीने दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली असून, रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे.