शहापूर : मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रविवारी कंटेनर उलटल्याने आणि मालवाहू ट्रक रस्त्यात बंद पडल्याने वाहतुक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे रविवारी सुट्टी निमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. अवघ्या १० ते १५ मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे पाऊण तास लागत होता.

जुना कसारा घाट येथील झिरो पॉईंट वळणावर रविवारी पहाटे एक कंटेनर उलटला. त्यातच एक मालवाहू ट्रक रस्त्यात बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावर वाहतुक एकेरी मार्गिकेने संथ गतीने सुरू होती. सकाळी १० वाजेपर्यंत जुन्या कसारा घाटातील वाहतूक कोंडी सुटली नव्हती. त्यामुळे कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. काही बेशिस्त वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहने चालविण्यास सुरूवात केल्याने कोंडीत भर पडली.

हेही वाचा…कचऱ्याच्या ट्रकच्या धडकेत लहानग्याने गमावला पाय, उल्हासनगरातील घटना, नागरिकांत संतापाचे वातावरण

दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जव्हार फाटा येथे पोहचले. त्यांनी महामार्ग पोलिसांच्या मदतीने हलकी वाहने पर्यायी रस्त्याने वळविली. शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी कसारा पोलिसांना सूचना केल्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील गावीत यांच्या पथकाने परिसरात वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. दुपारी १२ नंतर येथील वाहतुक कोंडी सुरळीत झाली.

Story img Loader