अंबरनाथ: जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून उल्हासनगर, ठाणे, मीरा-भाईंदरसह विविध औद्योगिक वसाहतींमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर छिद्र पाडून उघडपणे पाणी चोरी केली जात होती. अशा काही जोडण्यांवर एमआयडीसी प्रशासनाने कारवाई केली आहे. मात्र अजूनही अनेक चोरीच्या नळ जोडण्या असण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना, औद्योगिक वसाहतींना तसेच ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. बारवी धरणात साठवलेले आणि गरजेनुसार सोडलेले पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने वाहत येत उल्हास नदीला येऊन मिळते. येथे आपटी येथील बंधाऱ्यावर एमआयडीसी प्रशासन पाणी उचलते आणि अंबरनाथच्या जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर या पाण्यावर प्रक्रिया केली जाते. येथून हे पाणी मोठ्या जलवाहिन्यांच्या माध्यमातून अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, डोंबिवली औद्योगिक वसाहत, ठाणे, टीटीसी औद्योगिक वसाहत, मीरा-भाईंदर या महापालिकांना पुरवले जाते. या वाहिन्या मोठा प्रवास करतात.
या वाहिन्या अंबरनाथ शहर, अंबरनाथ तालुक्याचा ग्रामीण भाग, डोंबिवली असा प्रवास करत पुढे जातात. अंबरनाथहून निघणाऱ्या या जलवाहिन्या काटई रस्ता, शिळफाटा रस्ता असा प्रवास करतात. यादरम्यान रस्त्याच्या किनारी अनेक वाहन धुलाई दुकानांनी या मुख्य वाहिनीवर छिद्र पाडून बेकायदेशीर पद्धतीने दुकाने चालवली जात आहेत. याच रस्त्याला अनेक लहान-मोठे धाबे आणि हॉटेलसुद्धा आहेत. या अनधिकृत नळ जोडण्यांवर एमआयडीसी प्रशासन सातत्याने कारवाई करते. मात्र त्यानंतरही या मोठ्या जलवाहिन्यांवर छिद्र पाडून पुन्हा पाणी चोरी केली जाते.
अशाच काही दुकानांवर गुरुवारी एमआयडीसी प्रशासनाने कारवाई केली. अंबरनाथ काटई रस्त्यावर पाले गावाजवळ एमआयडीसी प्रशासनाने ही कारवाई केली. यावेळी मुख्य जलावाहिनीवर पाडण्यात आलेले छिद्रे बुजवण्यात आले. तर काही दुकानांवर कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी होते आहे.
अनेक नळजोडण्या अजूनही कायम
एमआयडीसीच्या जलवाहिन्यांवर असलेल्या बेकायदास नळ जोडण्या वेळीच काढल्या जात नसल्याने अनेकदा कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप होतो. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या ग्राहकांवर यामुळे अन्याय होतो. अनेकदा पाण्याचा दबाव इतका असतो की या छिद्र पडलेल्या ठिकाणी जलवाहिन्या फुटतात. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाला या जलवाहिन्या बदलाव्या लागल्या आहेत. त्याचे काम अजूनही सुरूच आहे. तसेच अनेक नळ जोडण्या अजूनही अस्तित्वात असून त्यावर वेळीच कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे.