ठाणे : रस्त्यालगत उभ्या असलेल्या वृक्षांवर सण-उत्सवांच्या काळात विद्युत रोषणाई करून वृक्षांचा फास आवळला जात असल्याने याची गंभीर दखल पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी घेण्यास सुरूवात केली आहे. ठाण्यातील पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहीत जोशी यांनी मुंबई, ठाणे आणि मिरा-भाईंदर महापालिका आणि राज्याच्या पर्यावरण विभागाला वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे. तसेच या नोटीसमध्ये विद्युत रोषणाई संदर्भाचे हरित लवाद आणि इतर न्यायालयाच्या आदेशाची प्रत देखील जोडली आहे. वृक्षांवरील विद्युत तारा हटविण्यासाठी तात्काळ पावले उचला अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल असेही त्यांनी सूचित केले आहे.
मुंबई महानगरात सण- उत्सव, सामाजिक, खासगी कार्यक्रम च्या कालावधीत मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. परिसर आकर्षित दिसावा म्हणून रस्त्यालगत असलेल्या वृक्षांच्या खोडांवर आणि फाद्यांवर सर्रास विद्युत तारांद्वारे रोषणाई केली जात आहे. हा प्रकार मागील काही वर्षांपासून वाढू लागला आहे. तसेच शहरातील तलाव, नैसर्गिक जलस्त्रोत येथेही रोषणाई होऊ लागली आहे. या रोषणाईमुळे वृक्षांच्या वाढीवर परिणाम होतो. अनेकदा तारांमध्ये बिघाड होऊन वृक्षांना आगी लागतात. वृक्षांवर लहान-मोठे किटक असतात. त्यांच्या प्रजनन संस्थेवर परिणाम होतो.
ठाणे जिल्ह्यात स्थलांतरीत पक्षी येत असतात. या पक्ष्यांना रोषणाईमुळे दिवस आणि रात्रीचा फरक कळत नाही. या पक्ष्यांच्या दिशा चुकतात. विद्युत रोषणाईच्या दुष्परिणाम जगभरातील शास्त्रज्ञांनी अनेक शोध निबंध प्रसिद्ध केले आहेत. तसेच संयुक्त राष्ट्र संघानेही याची गंभीर दखल घेत चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने वृक्षांवर रोषणाई करू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत. असे असतानाही ठाणे, नवी मुंबई, मुंबई, मिरा भाईंदर भागात वृक्षांवर विद्युत रोषणाई सुरू असल्याचा दावा रोहीत जोशी यांनी केला आहे.
महापालिकांकडून कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याने अखेर रोहीत जोशी यांनी वकिलामार्फत ठाणे, मुंबई आणि मिरा भाईंदर येथील महापालिकांना आणि राज्याच्या पर्यावरण विभागाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये शहरातील वृक्षांवर केलेल्या विद्युत रोषणाईची छायाचित्र, राष्ट्रीय हरित लवाद तसेच इतर न्यायालयाच्या आदेशांच्या प्रति देखील जोडण्यात आल्या आहेत. वृक्षांवरील विद्युत तारा तात्काळ हटविण्याचे आवाहन त्यांनी नोटीसद्वारे केले आहे. अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल करण्याचेही त्यांनी सूचित केले आहे.
हेही वाचा…ठाणे: श्वानाला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल
सण – समारंभ, सामाजिक अथवा खासगी सोहळे साजरे करताना वृक्षांवर केलेल्या तीव्र विद्युत रोषणाईचा दुष्परिणाम वृक्षा बरोबरच सूक्ष्म जीव, छोटे कीटक तसेच पक्ष्यांवर होतो. त्यांच्या जीवनचक्रावर याचे गंभीर परिणाम ओढवत असून अनवधानाने का होईना मनुष्य त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहे. माणसांप्रमाणेच सर्व सजीव या शहराचे नागरिक असून विश्वस्त म्हणून महापालिकांनी तत्काळ याविषयी कायदा बनविणे गरजेचे आहे. – रोहित जोशी, पर्यावरण कार्यकर्ते.