बदलापूर : बुधवारी महाशिवरात्रीनिमित्त एकीकडे शिवमंदिरांमध्ये भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. तर त्याचवेळी दुसरीकडे तापमानाचा पारा हा ठाणे जिल्ह्यात सरासरी ३९ अंश सेल्सियस पार गेल्याचे चित्र होते. विशेषतः ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीजवळ पलावा परिसरात पारा ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याची नोंद खासगी हवामान अभ्यासकांनी केली आहे. तर आसपासच्या डोंबिवली, कल्याण,उल्हासनगर, बदलापूर या शहरांमध्येही तापमान ३९ अंश सेल्सियसवर गेले होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच मे महिन्याचा अनुभव येत होता.
गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी दुपारच्यावेळी कमाल तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे सोमवारपासून तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. दुपारी तीनच्या सुमारास कमाल तापमान फेब्रुवारी महिन्याच्या सर्वोच्च आकड्यापर्यंत पोहोचले होते. बुधवारी सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्साह होता.
शिवमंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. मात्र दुपारच्या सुमारास भाविकांनाही उन्हाच्या झळा बसल्या. ठाणे जिल्ह्यातील बुधवारचे तापमान ४० अंश सेल्सियसवर पोहोचले होते. ठाणे जिल्ह्यातील पलावा परिसरात ४० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासकांनी दिली आहे. हा फेब्रुवारी महिन्यातला उच्चांक आहे. पलावा परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झाले आहे. अनेक टोलेजंग गृहसंकुलांची उभारणी या परिसरात सुरू आहे. त्याचवेळी कल्याण शिळफाटा रस्ता याच परिसरातून जातो. या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीही होत असते. त्यामुळे या परिसरात तापमान वाढल्याची शक्यता व्यक्त केली जाते.
तर ठाणे जिल्ह्यात ठाणे शहरपल्याडही अशाच प्रकारच्या कमाल तापमानाची नोंद झाली. बुधवारी दुपारी कल्याण शहरात ३९.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर त्या खालोखाल उल्हासनगर आणि डोंबिवली शहरात ३९.४ अंस सेल्सियस, बदलापुरात ३९.२ अंश सेल्सियस, ठाणे आणि नवी मुंबईत ३८.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. सोमवारीही ठाणे जिल्ह्यातील तापमान ३९ अंश सेल्सियसपर्यंत वर गेले होते. पश्चिम विक्षोभाच्या परिणामामुळे तापमानात वाढ झाल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासकांनी दिली आहे.