उल्हास नदीतील पाण्याची पातळी घटू लागल्याने पाटबंधारे विभागाने लागू केलेल्या १५ टक्के पाणी कपातीचा दुहेरी फटका येत्या काळात ठाणे तसेच कल्याण डोंबिवली या शहरांना बसेल हे स्पष्ट आहे.
ठाणे महापालिकेच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेले स्टेम प्राधिकरणाचे पाणी ठाण्यासह, भिवंडी, मीरा-भाइंदर या महापालिकांनाही वितरित होत असते. स्टेमच्या पाण्याचे गणित पाटबंधारे विभागाच्या आदेशावर ठरत असते. त्यामुळे पाटबंधारे विभागाचा पाणी कपातीचा निर्णय जाहीर होताच स्टेमची पाणी कपात लागलीच जाहीर होत असते. त्याचा थेट फटका ठाणे, भिवंडी आणि मीरा-भाइंदर या शहरांना बसतो. विशेष म्हणजे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून मिळणाऱ्या पाण्यावरही या महापालिकांची गुजराण होत असते. पाटबंधारे विभागाचे आदेश निघताच बारवी धरणातील पाणी उपशावर र्निबध येतात. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची पाणी कपात लागू होते. अशा प्रकारे स्टेम आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अशा दुहेरी पाणी कपातीचा फटका ठाण्यासारख्या शहराला बसणार असून यामुळे आठवडय़ातून दोन वेळा पाणी बंद ठेवण्याची वेळ येथील महापालिकेवर ओढवणार आहे.
पाटबंधारे विभागाच्या पाणी कपातीमुळे स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहराला पुरविण्यात येणारे पाणी कमी झाल्याने यापूर्वीच ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांसाठी महिन्यातून दोन वेळा पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही ठाणे आणि डोंबिवली अशा दोन शहरांना पाणी कपातीचा विचार सुरू केला आहे. असे झाल्यास आठवडय़ातून एक किंवा दोन वेळा येथील नागरिकांना पाण्यावाचून काढावे लागतील, अशी भीती आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा