ठाणे : देयकाची रक्कम मंजूर करण्यासाठी दोन टक्के रकमेची मागणी करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. विजय आव्हाड असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला न्यायालयात हजर केले असता २९ डिसेंबरपर्यंत त्याची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
तक्रारदार यांचे मित्र कंत्राटदार असून त्यांनी तक्रारदाराला कामाचे सर्व अधिकार दिले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेका घेऊन सुमारे १० लाख रुपयांचे काम पूर्ण केले होते. त्याचे देयक तक्रारदाराने काढले होते. या देयकाच्या रकमेवर दोन टक्के याप्रमाणे विजय आव्हाड याने त्यांच्याकडून २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यामध्ये त्याने स्वत:साठी पाच हजार रुपये आणि विभागातील कार्यकारी अभियंत्याला २० हजार रुपये अशी मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली.
हेही वाचा…कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता आव्हाड याने तडजोडीअंती २३ हजार मागितल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा रचून आव्हाड याला लाच घेताना हातोहात पकडले. त्याच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. परंतु त्यामध्ये काही आढळले नाही. त्याला दोन दिवसांची कोठडी मिळाली असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप-अधीक्षक धर्मराज सोनके यांनी दिली.