ठाणे : स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह गाणे आणि विधान केल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोमवारी दुपारी शिंदे गटाने टेंभीनाका परिसरात कुणाल कामरा याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान आणि गाणे केले आहे. समाज माध्यमातून याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता शिंदे गटाकडून याविषयी संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई आणि ठाण्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. सोमवारी दुपारी शिंदे गटाचे कार्यकर्ते टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जमले होते. त्यानंतर कार्यकर्ते आनंद आश्रम ते टेंभीनाका चौकापर्यंत चालत गेले. तिथे कुणाल कामरा याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाला. यावेळी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्यासंख्येने होते. यावेळी कुणाल कामरा याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे परिसरात वाहतुक कोंडी झाली.