बदलापूर: बेदरकार ट्रकने चिरडल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष पडवळ असे या कर्मचाऱ्यांचे नाव असून पाण्याची कळ सुरू करण्यासाठी जात असताना बदलापूर पश्चिम येथील वडवली रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी ट्रक चालकाला तात्काळ ताब्यात घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : कासारवडवली उड्डाणपुलाच्या कामामुळे कोंडीचा ताप

बदलापूर पश्चिम मधील वडवली येथे बारवी धरण रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. संतोष पडवळ आणि त्यांचे सहकारी असे दोघे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कंत्राटी कर्मचारी वडवली येथील पाण्याच्या टाकीजवळून वडवलीच्या दिशेने चालत होते. अचानक मागून वेगाने येणाऱ्या ट्रकने पडवळ यांना जोरदार धडक दिली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. ट्रकच्या चाकाखाली आल्याने पडवळ यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले सहकारी शेजारी असलेल्या झुडपात पडले. प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. बदलापूर पश्चिम पोलिसांनी पडवळ यांना शवविच्छेदनासाठी बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. या अपघातातील चालकावर कठोर कारवाईची मागणी होते आहे. तर या घटनेनंतर बदलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane badlapur maharashtra jeevan pradhikaran employee death in truck accident css